वॉशिंग्टन : वृत्तसंस्था : 'ट्विटर'च्या सीईओपदी भारतीय मूळ असलेल्या पराग अग्रवाल यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्यावर 'टेस्ला'चे सीईओ अॅलन मस्क यांनी कौतुकसुमनांचा वर्षाव केलाच; पण भारतीय विद्वत्तेचा अमेरिकन विकासाला मोठा हातभार लागल्याची कबुलीही दिली! स्ट्राईप कंपनीचे सीईओ तसेच सहसंस्थापक पॅट्रिक कॉलिसन यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना मस्क यांनी भारतीयांबद्दल हे गौरवोद्गार काढले.
ट्विटरचेे को-फाऊंडर जॅक डोर्सी यांनी सीईओपदाचा राजीनामा दिल्यानंतर अग्रवाल यांना या पदावर नेमण्यात आले. पॅट्रिक कॉलिसन यांनी पराग अग्रवाल यांचे अभिनंदन करताना लिहिले आहे की, गुगल, मायक्रोसॉफ्ट, अडोबी, आयबीएम, पालो आल्टो, नेटवर्क्स आणि आता ट्विटरचे सीईओ हे सारे भारतात लहानाचे मोठे झालेत.
आता ट्विटरचे सीईओही भारतीय… व्वा, क्या बात हैं! तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील भारतीयांचे आश्चर्यकारक यश बघून मला आनंद वाटतो. खूप अभिनंदन पराग! कॉलिसन यांच्या या ट्विटवर दिलेल्या प्रतिक्रियेत 'टेस्ला'चे अॅलन मस्क यांनी भारतीयांबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली.
मुंबईत शिक्षण पराग अग्रवाल यांचे आयआयटी मुंबईत शिक्षण झाले. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतून त्यांनी डॉक्टरेट केले. ट्विटरमध्ये 2011 या वर्षी ते मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून रुजू झाले. तत्पूर्वी, त्यांनी मायक्रोसॉफ्ट रिसर्च आणि 'याहू'सोबतही काही काळ काम केले.
जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांत भारतीय भरारी
कंपनी भारतीय सीईओ संपत्ती
मायक्रोसॉफ्ट सत्या नडेला 2,527
गुगल अल्फाबेट सुंदर पिचाई 1,924
अडोबी शांतनू नारायण 325
आयबीएम अरविंद कृष्णा 106
मायक्रॉन संजय मेहरोत्रा 95
व्हीएमवेअर रंगराजन रघुराम 51
अरिस्टा नेटवर्क्स जयश्री उल्लाल 38.7
नेटअॅप जॉर्ज कुरिअन 20
ट्विटर पराग अग्रवाल 38.5
(संपत्ती अब्ज डॉलरमध्ये)
मी ट्विटर सोडतोय. कारण, कंपनी आता माझ्याशिवाय चालू शकते. नवे सीईओ पराग अग्रवाल यांच्याबद्दल मला संपूर्ण खात्री आहे. गेल्या 10 वर्षांतील त्यांचे काम ट्विटरला नव्या उंचीवर नेणारे आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनी आकाशाला भिडेल, हा द़ृढविश्वास मला आहे.
– जॅक डोर्सी, संस्थापक, ट्विटर