

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कर्नाटकातून कोल्हापूर जिल्ह्यात येणार्या प्रवाशांना आता लसीचे दोन्ही डोस घेणे अथवा 72 तासांपूर्वी केलेल्या आरटीपीसीआर तपासणीचा निगेटिव्ह असल्याचा अहवाल दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे. याकरिता पुणे-बंगळूर महामार्गावर कोगनोळी टोल नाक्याजवळ तसेच जिल्ह्यातील कर्नाटक सीमेवरील सर्व रस्त्यांवर तपासणी नाके सुरू करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले.
दोन डोस अथवा आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल असल्याखेरीज कर्नाटक राज्यात प्रवेश दिला जात नाही. याच पद्धतीने आता कर्नाटकातून येणार्या प्रवाशांना जिल्हा प्रशासनाने नियम लागू केले आहेत. आरटीपीसीआर अहवाल नसेल, दोन डोस घेतले नसतील, तर त्या प्रवाशांना जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही. मात्र, तरीही कोणी प्रवेश केला तर संबंधितांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. चोरट्या मार्गाने जिल्ह्यात प्रवेश करणार्यांवरही गाव पातळीवरील पथके लक्ष ठेवून असून, अशा प्रवाशांनाही क्वारंटाईन केले जाईल, असेही रेखावार यांनी सांगितले.
जिल्ह्यातून कर्नाटकात दररोज ये-जा करणार्या वाहनधारकांनीही संपूर्ण लसीकरण लवकर पूर्ण करून घ्यावे, असेही जिल्हाधिकार्यांनी स्पष्ट केले. राज्य शासनाने तयार केलेला युनिव्हर्सल पास काढावा. तसेच, राज्य शासनाने जारी केलेल्या 9013151515 या व्हॉटस् अॅप नंबरवरून संपूर्ण लसीकरण झालेल्यांनी तसे सर्टिफिकेट प्राप्त करून घ्यावे. 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या नागरिकांसाठी, इतर शासकीय संस्थेने किंवा शाळेने दिलेले छायाचित्र ओळखपत्र आणि वैद्यकीय कारणांमुळे ज्या व्यक्ती, लस घेऊ शकत नाहीत त्या व्यक्तींसाठी, प्रमाणित वैद्यकीय प्रमाणपत्र प्रवेशासाठी कागदोपत्री पुरावा म्हणून वापरता येईल, असेही त्यांनी सांगितले.
विमानतळावर तपासणी कक्ष
कोणत्याही आंतरराष्ट्रीय शहरातून किंवा इतर राज्यांतून जिल्ह्यात येणार्या सर्व प्रवाशांनी दोन लसींचे डोस घेतल्याच्या प्रमाणपत्राची अथवा त्याच्याकडील आरटीपीसीआर अहवालाची तपासणी केली जाईल. याकरिता विमानतळावर विशेष कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. या दोन्हीपैकी काहीही नसेल तर संबंधित प्रवाशाला संस्थात्मक अलगिकरणामध्ये ठेवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.