मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दोन दिवसांच्या मुंबई दौर्यावर आहेत. मंगळवारी (ता.30) संध्याकाळी त्यांनी सिध्दिविनायका चरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली. त्याचवेळी 'जय मराठा, जय बांगला' असा नाराही त्यांनी दिला. दरम्यान उद्धव ठाकरे हे सध्या रुग्णालयात उपचार घेत असल्याने युवासेना अध्यक्ष पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी खासदार संजय राऊत यांच्यासह ममता यांची भेट घेऊन चर्चा केली.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला धूळ चारणार्या बॅनर्जी मंगळवारी मुंबईमध्ये दाखल झाल्या. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शन सोहळ्याला त्या बुधवार दिनांक 1 डिसेंबर रोजी हजर राहणार आहेत. त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार होत्या. पण, मुख्यमंत्री अजूनही रुग्णालयात असल्याने ही भेट होऊ शकली नाही.
ममता बॅनर्जी यांनी मुंबईत येताच सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी ममतादीदींच्या हस्ते गणरायाची आरती पार पडली. यावेळी अभिनेते आणि मंदिराचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी ममतादीदींचे स्वागत केले. त्यानंतर वार्ताहरांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, मी अनेकदा मुंबईत आले पण इथे येता आले नव्हते. अत्यंत प्रसन्न असे हे ठिकाण आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना आपण गणरायाकडे केल्याचे ममता यांनी सांगितले. सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाचही त्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर संध्याकाळी हॉटेल ट्रायडंट येथे ममता बॅनर्जी, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट झाली.
दरम्यान, ममता बॅनर्जी व उद्धव ठाकरे यांचे जिव्हाळ्याचे सबंध आहेत. बंगालच्या निवडणुकीत त्यांनी मोठा विजय मिळवला असून शिवसेनेने त्यांना पाठिंबा दिला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रुग्णालयात असल्यामुळे ते ममता यांना भेटू शकणार नाहीत. म्हणून मी त्यांचे स्वागत केले, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना व भाजप यांच्यात थेट लढत आहे. बॅनर्जी या भाजपच्या कट्टर विरोधक आहेत. त्यामुळे ममता यांना शिवसेनेशी जवळीक वाटते.ममता बॅनर्जी यांनी मुंबईत येणे आणि 'जय मराठा, जय बांगला' अशी घोषणे देणे शिवसेनेच्या पथ्यावर पडणारे आहे. मुंबईतला बंगाली मतदार सेनेच्या बाजुने उभा राहिली, अशी अटकळ त्यामागे बांधली जात आहे.
* ममता बॅनर्जी या बुधवारी दुपारी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींसोबत बैठकीला हजर राहणार आहेत. त्यानंतर दुपारी तीन वा.च्या सुमारास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्या भेट घेणार आहेत. त्यानंतर रात्री शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शन सोहळ्यात त्या हजर राहणार आहेत.