

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ग्रामीण भागातील लहान मुलांचे भोजन, शिक्षण, आरोग्याची काळजी घेत त्याच्यावर चांगले संस्कार करणार्या अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि पर्यवेक्षिकांचे समर्थ आणि सशक्त समाज घडविण्यात महत्त्वाचे योगदान आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या शरदचंद्र पवार सभागृहात महिला व बालकल्याण विभागातर्फे आयोजित आदर्श अंगणवाडी सेविका, मदतनीस,व पर्यवेक्षिका जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.
कार्यक्रमाला जि.प.अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजीत शिवतारे, महिला व बालकल्याण सभापती पुजा पारगे, बांधकाम सभापती प्रमोद काकडे, सारिका पानसरे, बाबूराव वायकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, उपमुख्यकार्याकारी अधिकारी जयसिंग गिरासे आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. शासकीय योजनांचे आणि परिणामतः शासनाचे यश त्यांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. कोरोनाकाळात अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्ती यांनी चांगले काम केले. कोरोनाच्या नव्या विषाणूचा धोका जगात असताना अंगणवाडी सेविकांनी आपल्या परिसरातील नागरिकांना मास्क वापराबाबत आग्रह करावा, असे आवाहन पवार यांनी केले. चांगल्या कामात सातत्य ठेवणे महत्त्वाचे असून पुरस्कारामुळे अधिक चांगले काम करण्याची जबाबदारी पुरस्कार विजेत्यांवर आहे, असेही ते म्हणाले.
स्वतःला भाषणात सेवक म्हणून घेण्याची फॅशन
महिला स्वतःला कधीच सेवक म्हणून घेत नाहीत. मात्र, त्यांच्या कामात सेवाभाव असतो. अनेकजण अलीकडच्या काळात स्वतःला भाषणात सेवक म्हणून घेतात. परंतु त्यांच्या आचारात कुठेही सेवाभव दिसत नाही.