पुढारी ऑनलाईन डेस्क : केरळमधील कन्नूर येथील एका खासगी कंपनीकडून इस्रायली पोलिसांना गणवेशाचा पुरवठा केला जात आहे. अलीकडे ही कंपनी चर्चेत होती; पण आता कंपनीने गाझावरील हल्ल्याच्या निषेधार्थ इस्रायली पोलिसांना गणवेशाचा पुरवठा करणार नसल्याचे जाहीर केले आहे. सध्याच्या ऑर्डरचा पुरवठा केला जाईल, पण जोपर्यंत इस्रायल गाझा पट्टीवर हल्ले थांबवत नाही, तोपर्यंत कंपनी इस्रायलकडून नवीन ऑर्डर घेणार नसल्याचे कंपनीने म्हटले आहे.
कन्नूर स्थित मरियम अॅपेरल प्रायव्हेट लिमिटेडचे मालक थॉमस ओलिकल यांनी एक निवेदन जारी केले आहे. त्यांच्या कंपनीने निर्णय घेतला आहे की, जोपर्यंत इस्रायल गाझा पट्टीवर हल्ले थांबवत नाही, तोपर्यंत कंपनी इस्रायली पोलिसांच्या गणवेशासाठी कोणतीही नवीन ऑर्डर घेणार नाही. गाझा येथील हॉस्पिटलवर नुकत्याच झालेल्या हल्ल्यानंतर हा निर्णय घेतल्याचे ओलिकल यांनी सांगितले. इस्रायली पोलिसांच्या गणवेशासाठी फिकट निळ्या रंगाचा शर्ट या कंपनीकडून गेल्या आठ वर्षांपासून पुरविला जात होता.
थॉमस ओलिकल म्हणाले की, "आम्ही २०१५ पासून इस्रायली पोलिसांसाठी गणवेश बनवत आहोत. हमासच्या हल्ल्यात नागरिकांची हत्या मान्य करता येणार नाही; पण त्याच प्रकारे इस्रायलने केलेली प्रत्युत्तरादाखल कारवाईही मान्य करता येणार नाही. गाझा पट्टीतील २.५ दशलक्ष लोकसंख्येचा अन्न आणि पाण्याचा पुरवठा थांबवणे, रुग्णालयांवर बॉम्बफेक करणे आणि निष्पाप महिला आणि मुलांची हत्या करणे अजिबात मान्य नाही. ही लढाई संपून शांतता यावी, अशी आमची इच्छा आहे."
ओलिकल यांनी म्हटले आहे की, "त्यांची कंपनी आधी मिळालेल्या ऑर्डरचा पुरवठा करेल, परंतु जोपर्यंत लढाई थांबत नाही तोपर्यंत नवीन ऑर्डर घेणार नाही. आम्ही सर्वांना संघर्ष थांबवण्याचे आवाहन करतो. इस्त्रायली पोलिसांसाठी गणवेशाची कमतरता भासणार नाही, कारण आम्ही पूर्वीच्या ऑर्डरचा पुरवठा करू. परंतु हा नैतिक निर्णय आहे. यामुळे आम्ही तात्पुरत्या स्वरूपात नवीन ऑर्डर न घेण्याचा निर्णय घेतला आहे."
हेही वाचा :