पुढारी ऑनलाईन डेस्क : परपुरुषांनी महिलेचा चेहरा पाहिला तर त्या महिलेचे महत्त्व संपते, असे अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने म्हटले आहे. "जेव्हा महिला घराबाहेर असतात, तेव्हा त्यांनी चेहरा पूर्ण झाकला पाहिजे, याबद्दल धर्मगुरूंचे एकमत आहे," असे तालिबान सरकारचे प्रवक्ते मौलवी मोहंमद सादिक अकिफ यांनी म्हटले आहे. (Taliban)
अकिफ यांनी असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये ही विधाने केली आहेत. द हिंदुस्तान टाइम्सने ही बातमी दिली आहे. "जर महिलांचा चेहरा सार्वजनिक ठिकाणी दृष्टीस पडत असेल तर पाप आहे. महिलांना हिजाबशिवाय पाहाणे अतिशय वाईट आहे, आणि आमचे मत आहे की महिलांनी चेहरा झाकला पाहिजे. महिलेला तिचे महत्त्व असते, आणि परपुरुषांने तिच्याकडे पाहिले तर तिचे महत्त्व कमी होते. हिजाबमधील महिलेला अल्ला महत्त्व देतो."
बुधावारी संयुक्त राष्ट्रांचे दूत गॉर्डन ब्राऊन यांनी महिलांना शिक्षण नकारल्याबद्दल तालिबानवर आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला चालला पाहिजे, असे मत व्यक्त केले होते. अकिफ यांनी गॉर्डन यांच्या वक्तव्यावर कोणतेही मत व्यक्त केले नाही. "शरीयाची अंमलबजावणी व्हावी, असे लोकांना वाटते. त्यामुळे आम्ही शरीयाची अंमलबजावणी करत आहोत. शरीयाचे कायदे १४०० वर्षांपासून अस्तित्वात आहेत, त्यात तालिबानने कोणताही बदल केलेला नाही."
आताच्या व्यवस्थेत कोणताही पुरुष महिलांचा छळ करू शकत नाही, किंवा महिलांकडे वाईट नजरेने पाहू शकत नाही, असे ते म्हणाले.
हेही वाचा