चिन्यांनी भारतीयांना 712 कोटींना फसविले! | पुढारी

चिन्यांनी भारतीयांना 712 कोटींना फसविले!

हैदराबाद ; वृत्तसंस्था :  दुबई येथील चिनी म्होरक्यांनी रग्गड कमाईचे आमिष दाखवून अनेक भारतीयांना मिळून 712 कोटी रुपयांत फसविल्याचे हैदराबाद पोलिसांनी उघडकीला आणले आहे. देशभरातून 9 जणांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व चिनी म्होरक्यांच्या इशार्‍यावर काम करत होते. काही क्रिप्टो वॉलेट व्यवहारांची हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेच्या वॉलेटशीही लिंक सापडली आहे. दहशतवादाला पैसा पुरविणार्‍या रॅकेटशी जोडलेले हे वॉलेट आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलिसांनी आरोपींकडून 17 मोबाईल फोन, दोन लॅपटॉप, 22 सिमकार्ड, चार डेबिट कार्ड, तीन चेकबुक आणि 33 कंपन्यांशी संबंधित कागदपत्रे जप्त केली आहेत.

हैदराबाद येथील एकाच्या तक्रारीवरून सायबर क्राईम पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या चौकशीत हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. तक्रारदाराला टेलिग्रामवर पडताळणीसाठी अर्धवेळ नोकरीची ऑफर देण्यात आली होती. त्याने संकेत स्थळावर नोंदणी केली. सुरुवातीला त्याला हजार रुपये गुंतवायला लावले गेले. या कामात त्याला 800 रुपयांचा नफा झाला. पुढे तक्रारदाराने 25 हजार रुपये गुंतवले आणि त्याने 20 हजार रुपये नफा कमावला. मात्र हे पैसे काढण्याची त्याला परवानगी मिळाली नाही. नंतर अधिक कमाईचे आमिष दाखवून त्याच्याकडून आणखी पैसे गुंतवून घेतले. अशी एकूण 28 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. फसवणुकीतून मिळविलेले पैसे दुबईत क्रिप्टो चलनात रूपांतरित झाले. हे 28 लाख रुपये सहा बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर झाल्याचे तपासातून समोर आले. येथून ही रक्कम वेगवेगळ्या भारतीय बँक खात्यांमध्ये वर्ग करून नंतर दुबईला पाठवण्यात आली. त्यातून तेथे क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्यात आल्या.

अहमदाबाद येथून अटक केलेल्या आरोपीच्या चौकशीअंती तो चिनी म्होरक्याशी थेट संपर्कात असल्याचे चौकशीतून समोर आले. हा आरोपी भारतीय बँक खात्यांचे तपशील आणि ओटीपी चिनी म्होरक्याला पाठवायचा. चिनी म्होरक्या रिमोट अ‍ॅक्सेस अ‍ॅप्सच्या माध्यमातून ही भारतीय खाती ऑपरेट करायचा.

   हेही वाचा : 

Back to top button