छत्तीसगडमधील दोन जहाल नक्षल्यांचे गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण | Naxalites surrendered | पुढारी

छत्तीसगडमधील दोन जहाल नक्षल्यांचे गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण | Naxalites surrendered

गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : छत्तीसगड राज्यात विविध हिंसक कारवाया करणाऱ्या दोन जहाल नक्षल्यांनी आज (दि. २४) गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. अडमा जोगा मडावी (२६) आणि टुगे कारु वड्डे(३५) अशी त्यांची नावे आहेत.

दोघेही छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. अडमा मडावी हा जिलोरगड, तर टुगे वड्डे हा कवंडे गावचा रहिवासी आहे. अडमा मडावी हा २०१४ मध्ये छत्तीसगडच्या पामेड लोकल गुर्रिल्ला स्क्वॉडमध्ये सहभागी झाला. २०२१ मध्ये त्याची झोन ऍ़क्शन टीममध्ये बदली झाली. जून २०२३ मध्ये तो दलम सोडून परत आला. त्याच्यावर ८ चकमकी, ५ जून, १ जाळपोळ व अन्य २ गुन्हे दाखल आहेत. २०१७ मध्ये बुरकापाल जंगलात झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव दलाचे २५ जवान शहीद झाले होते, त्यात अडमा मडावीचा सहभाग होता.

टुगे वड्डे हा २०१२ मध्ये जाटपूर दलम जनमिलिशियाचा सदस्य झाला. २०२३ पर्यंत तो कार्यरत होता. त्याच्यावर ६ खून आणि जाळपोळीचा १ गुन्हा दाखल आहे. छत्तीसगडसह गडचिरोली जिल्ह्यातील इरपणार येथे २०२२ मध्ये नक्षल्यांनी रस्ता बांधकामावरील १२ ट्रॅक्टर आणि जेसीबीची जाळपोळ केली होती, त्यात टुगे वड्डे सहभागी होता.

राज्य शासनाने अडमा मडावी याच्यावर ६ लाख, तर टुगे वड्डे याच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. परंतु आता त्यांनी आत्मसमर्पण केल्याने केंद्र व राज्य शासनाकडून पुनर्वसनासाठी अडमा मडावी यास साडेचार लाख रुपये, तर टुगे वड्डे यास चार लाख रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक श्री.नीलोत्पल यांनी पत्रकार परिषदेत दिली. २८ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत नक्षलवादी शहीद सप्ताह राबवून हिंसक कारवाया करतात. या पार्श्वभूमीवर दोन जहाल नक्षल्यांचे आत्मसमर्पण महत्वाचे असल्याचे नीलोत्पल म्हणाले. २०२२ पासून जुलै २०२३ पर्यंत १२ नक्षल्यांनी गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केल्याची माहिती नीलोत्पल यांनी दिली. नक्षल्यांनी हिंसेचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहनही त्यांनी केले. पत्रकार परिषदेला अतिरिक्त पोलिस अधीक्षक अनुज तारे व कुमार चिंता उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button