मंगळ ग्रहावरुन आलेली सर्वात मोठी उल्का | पुढारी

मंगळ ग्रहावरुन आलेली सर्वात मोठी उल्का

वॉशिंग्टन ः सध्या ‘नासा’चे पर्सिव्हरन्स हे रोव्हर मंगळ ग्रहावरील खडक आणि मातीचे नमुने गोळा करीत आहे. मात्र, यापूर्वीच मंगळाचा एक भाग मोठ्या उल्केच्या रूपात पृथ्वीवर आलेला आहे. मंगळावरील अशा अनेक उल्का वेळोवेळी पृथ्वीवर कोसळत असतात. आता यापैकी सर्वात मोठी उल्का प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहे.

या उल्केचे वजन 14.5 किलोग्रॅम आहे. तिच्या सर्वात रुंद भागाची रुंदी 10 सेंटीमीटर आहे. बेथेलमधील मैने मिनरल अँड जेम म्युझियममध्ये नुकतेच या उल्केचे प्रदर्शन करण्यात आले. या संग्रहालयात अंतराळातून कोसळलेले तब्बल 6 हजार खडक आहेत. त्यामध्ये चंद्रावरील खडकाचा मोठा तुकडा आणि सौरमंडळातील एखाद्या खगोलावर ज्वालामुखीमुळे बनलेल्या दगडाचाही समावेश आहे. मंगळावरील ही उल्का त्यावेळी अवकाशात उडाली ज्यावेळी एखादा धूमकेतू किंवा लघुग्रहाने मंगळाला धडक दिली. न्यू मेक्सिको युनिव्हर्सिटीतील इन्स्टिट्यूट ऑफ मेटिओरायटिक्सचे संचालक कार्ल अ‍ॅगी यांनी सांगितले की मंगळ ग्रहावरील खडक उल्केच्या रूपात पृथ्वीवर कोसळू शकतात. एखाद्या मोठ्या, शक्तिशाली आघातामुळे हे तुकडे मंगळावरून उडून अंतराळात जातात. प्रदर्शनासाठी ठेवलेल्या या मंगळ खडकाला ‘तौडेन्नी 002’ असे नाव आहे. पृथ्वीवर मंगळावरून आलेल्या एकूण 300 लहान-मोठ्या उल्का आहेत.

Back to top button