

तैपेई; पुढारी ऑनलाईन : चीनने हल्ला करण्याच्या तयारीने तैवानला चोहोबाजूनी घेरले आहे. याच दरम्यान तैवानमधून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाच्या संशोधन आणि विकास युनिटचे उपप्रमूख ओउ यांग ली-हसिंग यांचा मृत्यू झाला आहे. ते शनिवारी सकाळी हॉटेलच्या खोलीत मृतावस्थेत आढळून आले. याबाबतचे वृत्त Reuters ने तैवानच्या अधिकृत वृत्तसंस्थेच्या (CNA) हवाल्याने दिले आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांनी सांगितले की, ५७ वर्षीय ओउ यांग यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे आणि त्यांच्या हॉटेलच्या खोलीत कोणत्याही प्रकारची 'घुसखोरी'ची चिन्हे दिसून आलेली नाहीत, असे सीएनएने म्हटले आहे. एका रिपोर्टनुसार, त्याच्या कुटुंबीयांनी यांग यांना हृदयविकाराचा त्रास होता, असे म्हटले आहे.
या वृत्तानुसार, तैवानच्या संरक्षण मंत्रालयाच्या संशोधन आणि विकास युनिटचे उपप्रमूख मृतावस्थेत सापडल्याने तैवानमध्ये खळबळ उडाली आहे. ओउ यांग दक्षिणेकडील पिंगटूंगमध्ये बिझनेस ट्रीपवर गेले होते. सीएनएने म्हटले आहे की, त्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला संशोधन आणि विकास युनिटचे उपप्रमूखपद स्वीकारले होते. विविध क्षेपणास्त्र उत्पादन प्रकल्पांवर देखरेख ठेवण्याची त्यांच्याकडे जबाबदारी होती.
तैवानच्या लष्कराची संशोधन आणि विकास संस्था या वर्षी वार्षिक क्षेपणास्त्र उत्पादन क्षमता दुप्पट करण्यासाठी काम करत आहे. चीनच्या वाढत्या लष्करी धोक्याच्या शक्यतेने तैवान आपली लष्करी ताकद वाढविण्याचा प्रयत्न करत आहे.
तैवानच्या सभोवताली चीनने सुरू केलेल्या सर्वात मोठ्या युद्धसरावात चीनची २० लढाऊ विमाने आणि १० युद्धनौका तैवानच्या हवाई हद्दीत घुसली आहेत. या युद्धसरावात चीनची जवळपास १०० लढाऊ विमाने आणि १० युद्धनौका सहभागी झाल्या आहेत. एकप्रकारे या युद्धसरावातून चीनने आपले मोठे सैन्य तैवानच्या वेशीवर आणून ठेवले असून तैवानवर मोठा दबाव निर्माण केला आहे. (China-Taiwan)
चीनच्या धमकीला न जुमानता नुकतीच अमेरिकन संसदेतील सभापती नॅन्सी पेलोसी यांनी तैवानला भेट दिली होती. नंतर चीनने सहा बाजूंनी तैवानला घेराव घातला आहे. चीन तैवानवर कोणत्याही क्षणी हल्ला करू शकतो, अशी भीती जगभरात आहे. चीन अतिआत्मविश्वासात आहे, तर तैवानही तयारीत आहे. तैवानच्या सर्व बाजूंनी समुद्रच आहे. तैवानवर ताबा मिळवायचा तर चीनला समुद्र ओलांडावा लागणार आहे. चीनसाठी हे वाटते तेवढे सोपे नाही. कारण गेल्या ४० वर्षांपासून तैवान गिळंकृत करण्याचे चीनचे प्रयत्न सुरू आहेत… आणि तेवढ्याच वर्षांपासून तैवानचीही चीनला ठेचण्याची तयारीही सुरू आहे.
लोकसंख्या, राष्ट्रीय संपत्ती, उत्पन्न, लष्करी सज्जता अशा थेट तुलनेत कुणालाही तैवान कमकुवत दिसत असला तरी बलाढ्य चीनलाही इटुकल्या तैवानवर विजय मिळवणे सोपे ठरणार नाही. युद्ध झाल्यास आपण फार खर्चात न पडता चीनला ते महाग पडावे, या मुख्य धोरणासह तैवानने १० योजना युद्धासाठी आखून ठेवलेल्या आहेत.