चीनविरुद्ध तैवानचे 10 प्लॅन! | पुढारी

चीनविरुद्ध तैवानचे 10 प्लॅन!

तैपेई : वृत्तसंस्था : चीनच्या धमकीला न जुमानता अमेरिकन संसदेतील सभापती नॅन्सी पेलोसी यांनी तैवानला भेट दिली. नंतर चीनने सहा बाजूंनी तैवानला घेराव घातला. चीन तैवानवर कोणत्याही क्षणी हल्ला करू शकतो, अशी भीती जगभरात आहे. चीन अतिआत्मविश्वासात आहे, तर तैवानही तयारीत आहे. तैवानच्या सर्व बाजूंनी समुद्रच आहे. तैवानवर ताबा मिळवायचा तर चीनला समुद्र ओलांडावा लागणार आहे. चीनसाठी हे वाटते तेवढे सोपे नाही. कारण गेल्या 40 वर्षांपासून तैवान गिळंकृत करण्याचे चीनचे प्रयत्न सुरू आहेत… आणि तेवढ्याच वर्षांपासून तैवानचीही चीनला ठेचण्याची तयारीही सुरू आहे.

तैवान भोवतालच्या सर्व समुद्री सीमा सुरक्षित असाव्यात म्हणून तैवानी लष्करातील प्रत्येक जवानाचे समुद्राशी नाते आणि नाळ घट्ट करून ठेवण्यात आली आहे. तैवानच्या लष्करात प्रशिक्षणच असे दिले जाते की, माणसाचा एका अर्थाने मासा होतो. तो दीर्घकाळ पोहू शकतो, पाण्याखाली राहू शकतो…

लोकसंख्या, राष्ट्रीय संपत्ती, उत्पन्न, लष्करी सज्जता अशा थेट तुलनेत कुणालाही तैवान कमकुवत दिसत असला तरी बलाढ्य चीनलाही इटुकल्या तैवानवर विजय मिळवणे सोपे ठरणार नाही. युद्ध झाल्यास आपण फार खर्चात न पडता चीनला ते महाग पडावे, या मुख्य धोरणासह तैवानने 10 योजना युद्धासाठी आखून ठेवलेल्या आहेत.

तैवानची युद्धासाठीची तयारी

1 अमेरिकेकडून थेट मदतीचा शब्द तैवानने मिळविलेला आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी, चीनने तैवानवर हल्ला केल्यास अमेरिका तैवानचे रक्षण करेल, असे म्हटलेले आहे.

2 1940 च्या दशकातील गृहयुद्धात चीन आणि तैवान वेगळे झाले. तेव्हापासून तैवान स्वतंत्र आहे, तर चीन मालकी सांगत आला आहे. चीनचा धोका 1940 पासून आणि तैवानची तयारीही तेव्हापासून आहे.

3 ‘पार्कुपाईन’ धोरणानुसार चीनला हल्ला करणे शक्य तितके कठीण आणि खर्चिक बनवून सोडण्यात तैवान यशस्वी ठरला आहे. तैवानने विमानरोधी, रणगाडारोधी, जहाजरोधी यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

4 तैवानच्या स्वस्त अशा ड्रोन आणि ‘मोबाईल कोस्टल डिफेन्स क्रूझ मिसाईल्स’मध्ये चीनच्या महागड्या युद्धनौका आणि नौदलाची उपकरणे उडवून लावण्याची क्षमता आहे.

5 तैवान सर्व बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे. तैवानवर कब्जा करण्यासाठी चीनला सैन्य, शस्त्रे, दारूगोळा, अन्न, वैद्यकीय पुरवठा आणि इंधन समुद्र ओलांडून न्यावे लागेल. तैवानच्या बेटांवर आधीच असलेली निगराणी उपकरणे चिनी विमानांचा वेध घेण्यात सक्षम आहेत.

6 सागरी संरक्षणाचा मुकाबला करून चिनी सैनिक तैवानमध्ये दाखल झाले तरी तैवानने आपली शहरेही गनिमी काव्यात तरबेज करून ठेवलेली आहेत. इमारतींचे रूपांतर बरॅकमध्ये करता येईल अशी तयारी आहे.

7 तीन महिन्यांत तैवानने सर्व वयोगटातील आणि व्यवसायातील लोकांसाठी रायफल प्रशिक्षणाताची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तैवानमधील प्रत्येक जण युद्धासाठी तयार आहे.

8 एअरक्राफ्ट आणि अँटी बॅलेस्टिक संरक्षण प्रणालींचे संरक्षणही केले जाईल. या प्रणालींनीच चीनची बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे रोखली जातील. नष्टही केली जातील. अनेक अद्ययावत लढाऊ विमानांची खरेदीही तैवानने करून ठेवलेली आहे.

9 विमानतळांवर बॉम्बस्फोट झाल्यास महामार्गावर विमाने उतरवण्याचे प्रशिक्षण वैमानिकांना दिलेले आहे.

10 ‘सीआयए’ या गुप्तचर यंत्रणेची मदतही पुरविली जाईल, असा शब्द तैवानने अमेरिकेकडून मिळवून घेतला आहे. युद्ध झाल्यास ते चीनसाठी अवघड, खर्चिक तर ठरेलच; पण चीनची मोठी मनुष्यहानीही तैवानला शक्य आहे, असा संदेश तैवानकडून सातत्याने देण्यात येत आहे.

* लष्करात भरतीसाठी 10 आठवडे प्रशिक्षण दिले जाते.
* जास्त वेळ समुद्रात, तरण तलावात घालवावा लागतो.
* दीर्घकाळ पाण्याखाली राहणे शिकावे लागते.
* संपूर्ण गणवेशात वेगात व दीर्घकाळ पोहावे लागते
* पाण्याखाली दीर्घकाळ श्वास रोखून धरावा लागतो.
* खात्रीसाठी हात-पाय बांधून प्रशिक्षणार्थ्यांना पाण्यात टाकले जाते.
* माणसाला तैवानमध्ये सैनिक व्हायचे तर त्याला मासा व्हावे लागते!

Back to top button