अमेरिका-तैवान ‘मैत्री’वर चीनचा ‘थयथयाट’, तैवानवरील आर्थिक निर्बंध आणखी तीव्र | पुढारी

अमेरिका-तैवान 'मैत्री'वर चीनचा 'थयथयाट', तैवानवरील आर्थिक निर्बंध आणखी तीव्र

पुढारी ऑनलाईन डेस्‍क: : चीनचा विरोध धुडकावत अमेरिकन ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह’च्या (संसदेचे सभागृह) अध्यक्षा नॅन्सी पेलोसी (Nancy Pelosi) यांनी तैनाव दौरा केला. नॅन्‍सी यांनी तैवानच्‍या अध्‍यक्षा त्‍साई इंग-वेग यांची भेट घेतली. अमेरिका तैवानला एकटं कधीच सोडणार नाही, आम्‍हाला तैवान सोबत असणार्‍या मैत्रीचा अभिमान आहे, असेही नॅन्‍सी पलोसी यांनी स्‍पष्‍ट केले आहे. या दौर्‍यानंतर त्‍या दक्षिण कोरिया दौर्‍यासाठी रवाना झाल्‍या आहेत. दरम्‍यान, अमेरिकेच्‍या भुमिकेवर चीनने तीव्र नाराजी व्‍यक्‍त केली आहे. तसेच यापूर्वी लावण्‍यात आलेले आर्थिक निर्बंध आणखी कडक करण्‍याचा निर्णय घेतला आहे.

नॅन्सी पेलोसी या तैवानची राजधानी तैपेई येथे दाखल झाल्या होत्‍या.त्यांच्या या दौर्‍याला चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आधीच हरकत घेतली होती. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी व्हर्च्युअल चर्चेतही, आगीशी खेळाल तर जळून खाक व्हाल, अशी थेट धमकी जिनपिंग यांनी दिली होती. हा विरोध झुगारत नॅन्‍सी यांनी तैवानच्‍या अध्‍यक्षा त्‍साई इंग-वेग यांची भेट घेतली. तसेच यापुढे आम्‍ही तैवानला कधीच एकटे सोडणार नाही, असे स्‍पष्‍ट करत चीनच्‍या विरोधाला अमेरिका जुमानत नसल्‍याचेच त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

तैवानमध्‍ये असताना लोकशाहीच्‍या समर्थनार्थ अमेरिका ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह’च्या (संसदेचे सभागृह) अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी म्‍हटले होते की, आम्‍ही तैवानच्‍या लोकशाहीचे समर्थन करतो. आज जग एकाधिकारशाही आणि लोकशाही यामध्‍ये संघर्ष करत आहे.

तैवान कोणासमोरही झुकणार नाही…

यावेळी तैवानच्‍या अध्‍यक्षा त्‍साई-इंग-वेन यांनी सांगितले की, “आम्‍हाला सातत्‍याने लष्‍करी कारवाईच्‍या धमक्‍या मिळत आहेत. मात्र अशा धमक्‍यांसमोर झुकणार नाही. आम्‍ही आमच्‍या देशाचे स्‍वतंत्र अस्‍तित्‍व आणि लोकशाही काय ठेवण्‍यासाठी प्रयत्‍नशील आहोत”.

चीनचा युद्धसराव

उत्तरादाखल चीनने तैवान सीमेजवळ लष्करी सराव सुरू केला असून, अमेरिकेला अत्यंत गंभीर परिणाम भोगावे लागतील, या धमकीचा पुनरुच्चारही केला. अमेरिका, तैवान आणि चीन या तिन्ही देशांनी आपापल्या सैन्याला युद्धासाठी सज्ज राहण्यास सांगितले आहे.

चीनने तैवानवरील आर्थिक निर्बंध वाढवले

अमेरिकन ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह’च्या (संसदेचे सभागृह) अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी तैवानला भेट दिल्‍याने चीन बिथरला आहे. त्‍यांनी तैवानची आर्थिक कोंडी करण्‍यास सुरु केली आहे. तैवानला होणार्‍या नैसिर्गक वाळूची निर्यात रोखण्‍याचा निर्णय चीनने घेतला आहे. कोरोना महामारीनंतर तैवानमधील बांधकाम व मूलभत सुविधा उभारणे हे मूळ आर्थिक स्‍त्रोत बनले होते. मात्र आता चीनने वाळूबंदी निर्यातच बंद करुन तैनावची आर्थिक कोंडी करण्‍याचा प्रयत्‍न करत आहे. १ जुलैपासूनच चीनने तैवानमधील १०० पेक्षा अधिक धान्‍य पुरवठा आयातीवरही प्रतिबंध लावला आहे. आर्थिक निर्बंध आणखी कडक करताना चीन लष्‍कराचे लढाऊ विमानांकडून तैवानमध्‍ये आता अधिक घुसखोरी होईल, असे मानले जाते.

नेमका वाद काय?

तैवान या देशाची स्‍वतंत्र घटना आहे. तसेच लोकशाही मार्गाने सत्तेत आलेले सरकार आहे. तर चीनमधील कम्‍युनिस्‍ट सरकार तैवानला आपल्‍याच देशाचा हिस्‍सा मानते. तैवानने आपले वर्चस्‍व मान्‍य करावे यासाठी चीन धडपड करत आहे. तसेच आर्थिक निर्बंध लादून तैवानला जेरीस आणण्‍याचाही प्रयत्‍न करत आहे. अमेरिका हे तैवानला स्‍वतंत्र लोकशाही असणारे राष्‍ट्र म्‍हणून पाठिंबा देत आहे. दोन महिन्‍यांपूर्वी अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष ज्‍यो बायडेन यांनी म्‍हटले होते की, “अमेरिका वन चायना पॉलिसीला मंजुरी दिली आहे. तसेच या करारावर सहीही केली आहे. याचा अर्थ असा नाही की, चीन तैवानवर दडपशाहीने कब्‍जा करु शकेल. चीनचे हे प्रयत्‍न केवळ चुकीचे नाहीत तर या संपूर्ण प्रदेशाला युद्‍धाच्‍या खाईत लोटण्‍याचा हा प्रकार आहे.”

अमेरिकन युद्धनौका सज्ज

अमेरिकन नौदलाच्या चार युद्धनौका हाय अलर्टवर असून तैवानच्या सागरी सीमेवर गस्त घालत आहेत. एफ-16 आणि एफ-35 सारखी अत्त्याधुनिक लढाऊ विमाने या नौकांवर सज्ज आहेत. रीपर ड्रोन आणि लेझर गाईडेड मिसाईल्सही तत्पर आहेत.चीनने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यास अमेरिका आणि तैवान दोन्ही बाजूंनी चीनवर हल्ला करू शकतात, अशी तयारी करण्यात आली आहे. चीननेही दीर्घ पल्ल्याचे हुडोंग रॉकेटस् सज्ज ठेवले आहेत.

हेही वाचा : 

 

 

Back to top button