युद्धाचे ढग दाटले..! : चीनने तैवानच्‍या सीमेजवळ डागले ११ क्षेपणास्‍त्र, सीमेपासून केवळ १६ किलोमीटर अंतररावर युद्धसराव | पुढारी

युद्धाचे ढग दाटले..! : चीनने तैवानच्‍या सीमेजवळ डागले ११ क्षेपणास्‍त्र, सीमेपासून केवळ १६ किलोमीटर अंतररावर युद्धसराव

तैपेई; पुढारी ऑनलाईन : अमेरिकन प्रतिनिधीमंडळाच्‍या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यामुळे थयथयाट सुरु केलेल्‍या चीनने तैवानच्‍या समुद्र सीमेजवळ आज क्षेपणास्‍त्र डागले. चीनच्‍या या कृतीचा तैवानने तीव्र निषेध केला आहे. दरम्‍यान, चीनने सुरु केलेल्‍या युद्धसरावामुळे तैवानला येणार्‍या आणि जाणार्‍या सुमारे ५० विमाने रद्‍ करण्‍यात आली आहेत. चीनचे वर्तन हे अत्‍यंत बेजबाबदार आणि शांततेचा भंग करणार असल्‍याचे तैवानने म्‍हटलं आहे.आम्‍हाला युद्ध नको आहे;पण वेग पडल्‍यास आम्‍ही युद्धासाठी सज्‍ज असल्‍याचा इशाराही दिला आहे.

तैवानच्‍या संरक्षण मंत्रालयाने म्‍हटले आहे की, चीनने तैवानच्‍या उत्तर-पूर्व आणि दक्षिण-पश्‍चिम सीमेवरील समुद्रजवळ ११ डॉगफेंग क्षेपणास्‍त्र डागले आहेत. अशा प्रकराचे क्षेपणास्‍त्राचा वापर चीनच्‍या पीपुल्‍स लिबरेशन आर्मीकडूनच होतो. चीनच्‍या या कृतीमुळे आम्‍हीही आपल्‍या लष्‍कर सतर्क झाले आहे. चीनची कृती हे अत्‍यंत बेजबाबादर आणि शांतता भंग करणारी आहे.

तैवानच्‍या सीमेपासून केवळ १६ किलोमीटर अंतरावर युद्धसराव

हा सर्व युद्धसराव तैवानपासून केवळ १६ किलोमीटर दूर अंतरावर केला जात आहे. या सरावात खरे बॉम्‍ब आणि हत्‍यारांचा वापर होत आहे. तसेच ७ ऑगस्‍टपर्यंत हा सराव सुरु राहणार असल्‍याचे चीनच्‍या सरकारी वृत्तसंस्‍थेने म्‍हटलं आहे. यापूर्वी तैवान सीमेपासून १०० किलोमीटर अंतरावर चीन युद्धसराव करत असे. मात्र अमेरिकन प्रतिनिधीमंडळाच्‍या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्‍या तैवान दौर्‍यानंतर आता १६ किलोमीटर अंतरावरच हा सराव सुरु झाल्‍याने दोन्‍ही देशांमधील तणाव कमालीचा वाढला आहे.

तैवानच्या आजूबाजूच्या सहा झोनमध्ये थेट फायर

तैवानच्या आजूबाजूच्या सहा झोनमध्ये थेट फायर करत सराव सुरु केल्याने चीन कधीही हल्ला करु शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हा सराव व्यस्त जलमार्गांमध्ये होत आहेत आणि त्यात लांब पल्ल्याच्या लाइव्ह फायरिंगचा समावेश असल्याचे समजते. दरम्यान, यावर तैवानने चीन या भागातील स्थिती बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यामुळे चीनचा जळफळाट झाला आहे. चीनने तैवानला आर्थिक अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. चिनी सरकारने तैवानला नैसर्गिक वाळू देणे थांबवले आहे. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

पेलोसींनी चीनला पुन्हा डिवचले

कोरोना महारोगराईनंतर बांधकाम आणि पायाभूत सुविधा विकास हा तैवानसाठी एक उत्पन्‍नाचा मार्ग बनला आहे. त्यामुळे चीनने वाळू निर्यात थांबविल्याने तैवानचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. १ जुलैलादेखील चीनने तैवानच्या १०० हून अधिक खाद्यान्‍नांच्या आयातीवर बंदी घातली होती.

अमेरिकन नौदलाच्या चार युद्धनौका हाय अलर्टवर (China-Taiwan tensions) असून या युद्धनौका तैवानच्या समुद्री सीमेत गस्त घालत आहेत. या युद्धनौकांवर एफ-१६ आणि एफ-३५ यासारखी अत्याधुनिक लढाऊ विमाने तसेच क्षेपणास्त्रे आहेत. यावर रीपर ड्रोन आणि लेझर गायडेड क्षेपणास्त्रेही तैनात आहेत. चीनने काही आगळीक केली, तर अमेरिकेच्या या युद्धनौका आणि तैवान असे दोन्हीकडून चिनी हल्ल्याला प्रत्युत्तर मिळू शकते.

उत्तर कोरियाकडून निषेध

उत्तर कोरियाने पेलोसी यांच्या तैवान भेटीचा निषेध केला. अमेरिका चीनच्या अंतर्गत मुद्द्यात दखल देत असल्याचे उ. कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. दरम्यान, 25 वर्षांनंतर प्रथमच अमेरिकन संसदेच्या सभापती तैवान दौर्‍यावर गेल्या आहेत. 1997 मध्ये सभापती न्यूट गिंगरिक यांनी तैवान दौरा केला होता.

सुरक्षिततेच्या मुद्द्यावर अमेरिका नेहमीच तैवानच्या सोबत आहे आणि राहील. आम्हाला तैवानसोबत मैत्रीचा अभिमान आहे, असे प्रतिपादन अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी केले आहे. तैवान दौर्‍याच्या दुसर्‍या दिवशी बुधवारी त्यांनी तैवानच्या संसदेत भेट दिली. येथे त्यांची तैवानचा सर्वोच्च सन्मान ‘ऑर्डर ऑफ प्रॉपिटियस क्‍लाऊडस् विथ स्पेशल ग्रँड कॉर्डन’ने गौरव करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.

ताबा मान्य करायला लावणे, हे चीनचे उद्दिष्ट

चीनच्या वन चायना धोरणानुसार चीन तैवानला स्वतःचा भाग मानतो, तर तैवान स्वतःला स्वतंत्र देश मानतो. तैवानला आपल्या राजकीय मागण्यांसमोर झुकवणे आणि चीनचा ताबा मान्य करायला लावणे, हे चीनचे उद्दिष्ट आहे. विशेष म्हणजे, अमेरिकेचीदेखील वन चायना धोरणाला मान्यता आहे; पण तैवानवर बलपूर्वक चीनने ताबा मिळवणे, अमेरिकेला मान्य नाही.पेलोसी यांनी तैवानचे राष्ट्रपती साई इंग वेन यांचीही भेट घेतली. यावेळी वेन यांनी लष्करी संकटासमोर देश झुकणार नाही, असे स्पष्ट केले. पॅलोसी म्हणाल्या, अमेरिकेने ४३ वर्षांपूर्वी तैवानसोबत राहण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यावर अमेरिका आजही ठाम आहे.

चीनने आतापर्यंत काय केले?

  • पेलोसी यांच्या दौर्‍यापूर्वी तैवानवर चीनने सायबर हल्ला केल्याच्या, तैवानच्या राष्ट्राध्यक्षांचे संकेतस्थळ हॅक केले.
  • तैपेई विमानतळ बॉम्बने उडविण्याची धमकी दिली चीनच्या लढाऊ विमानांचे तैवानच्या सीमेवर उड्डाण
  • चिनी नौदलाने तैवानच्या सर्व बाजूंनी युद्धनौका तैनात करून युद्धसराव
  • तैवानवर आर्थिक निर्बंध लागू केले
  • पेलोसी तैवानमध्ये दाखल झाल्यानंतर चीनने तैवानच्या पूर्वेकडील समुद्रात क्षेपणास्त्रांचे परीक्षण केले
  • तैवानच्‍या उत्तर-पूर्व आणि दक्षिण-पश्‍चिम सीमेवरील समुद्रजवळ ११ डॉगफेंग क्षेपणास्‍त्र डागले

Back to top button