China-Taiwan tensions : चीनने तैवानला घेरले; थेट फायर करत सुरु केला सर्वात मोठा युद्धसराव! | पुढारी

China-Taiwan tensions : चीनने तैवानला घेरले; थेट फायर करत सुरु केला सर्वात मोठा युद्धसराव!

तैपेई; पुढारी ऑनलाईन : अमेरिका आणि चीनमध्ये तैवानवरुन (China-Taiwan tensions) तणाव वाढतच चालला आहे. दरम्यान, चीनने तैवानच्या आजूबाजूच्या समुद्रात आतापर्यंतचा सर्वात मोठा लष्करी सराव सुरू केला आहे. तैवानच्या आजूबाजूच्या सहा झोनमध्ये थेट फायर करत सराव सुरु केल्याने चीन कधीही हल्ला करु शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हा सराव व्यस्त जलमार्गांमध्ये होत आहेत आणि त्यात लांब पल्ल्याच्या लाइव्ह फायरिंगचा समावेश असल्याचे समजते. दरम्यान, यावर तैवानने चीन या भागातील स्थिती बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यामुळे चीनचा जळफळाट झाला आहे. चीनने तैवानला आर्थिक अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. चिनी सरकारने तैवानला नैसर्गिक वाळू देणे थांबवले आहे. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

कोरोना महारोगराईनंतर बांधकाम आणि पायाभूत सुविधा विकास हा तैवानसाठी एक उत्पन्‍नाचा मार्ग बनला आहे. त्यामुळे चीनने वाळू निर्यात थांबविल्याने तैवानचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. १ जुलैलादेखील चीनने तैवानच्या १०० हून अधिक खाद्यान्‍नांच्या आयातीवर बंदी घातली होती.

अमेरिकन नौदलाच्या चार युद्धनौका हाय अलर्टवर (China-Taiwan tensions) असून या युद्धनौका तैवानच्या समुद्री सीमेत गस्त घालत आहेत. या युद्धनौकांवर एफ-१६ आणि एफ-३५ यासारखी अत्याधुनिक लढाऊ विमाने तसेच क्षेपणास्त्रे आहेत. यावर रीपर ड्रोन आणि लेझर गायडेड क्षेपणास्त्रेही तैनात आहेत. चीनने काही आगळीक केली, तर अमेरिकेच्या या युद्धनौका आणि तैवान असे दोन्हीकडून चिनी हल्ल्याला प्रत्युत्तर मिळू शकते.

उत्तर कोरियाकडून निषेध

उत्तर कोरियाने पेलोसी यांच्या तैवान भेटीचा निषेध केला. अमेरिका चीनच्या अंतर्गत मुद्द्यात दखल देत असल्याचे उ. कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. दरम्यान, 25 वर्षांनंतर प्रथमच अमेरिकन संसदेच्या सभापती तैवान दौर्‍यावर गेल्या आहेत. 1997 मध्ये सभापती न्यूट गिंगरिक यांनी तैवान दौरा केला होता.

सुरक्षिततेच्या मुद्द्यावर अमेरिका नेहमीच तैवानच्या सोबत आहे आणि राहील. आम्हाला तैवानसोबत मैत्रीचा अभिमान आहे, असे प्रतिपादन अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी केले आहे. तैवान दौर्‍याच्या दुसर्‍या दिवशी बुधवारी त्यांनी तैवानच्या संसदेत भेट दिली. येथे त्यांची तैवानचा सर्वोच्च सन्मान ‘ऑर्डर ऑफ प्रॉपिटियस क्‍लाऊडस् विथ स्पेशल ग्रँड कॉर्डन’ने गौरव करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.

चीनच्या वन चायना धोरणानुसार चीन तैवानला स्वतःचा भाग मानतो, तर तैवान स्वतःला स्वतंत्र देश मानतो. तैवानला आपल्या राजकीय मागण्यांसमोर झुकवणे आणि चीनचा ताबा मान्य करायला लावणे, हे चीनचे उद्दिष्ट आहे. विशेष म्हणजे, अमेरिकेचीदेखील वन चायना धोरणाला मान्यता आहे; पण तैवानवर बलपूर्वक चीनने ताबा मिळवणे, अमेरिकेला मान्य नाही.

पेलोसी यांनी तैवानचे राष्ट्रपती साई इंग वेन यांचीही भेट घेतली. यावेळी वेन यांनी लष्करी संकटासमोर देश झुकणार नाही, असे स्पष्ट केले. पॅलोसी म्हणाल्या, अमेरिकेने ४३ वर्षांपूर्वी तैवानसोबत राहण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यावर अमेरिका आजही ठाम आहे.

चीनने आतापर्यंत काय केले?

  • पेलोसी यांच्या दौर्‍यापूर्वी तैवानवर चीनने सायबर हल्ला केल्याच्या, तैवानच्या राष्ट्राध्यक्षांचे संकेतस्थळ हॅक केल्याच्या बातम्या आल्या.
  • तैपेई विमानतळ बॉम्बने उडविण्याची धमकी दिली
  • चीनच्या लढाऊ विमानांचे तैवानच्या सीमेवर उड्डाण
  •  चिनी नौदलाने तैवानच्या सर्व बाजूंनी युद्धनौका तैनात करून युद्धसराव
  •  तैवानवर आर्थिक निर्बंध लागू केले
  • पेलोसी तैवानमध्ये दाखल झाल्यानंतर चीनने तैवानच्या पूर्वेकडील समुद्रात क्षेपणास्त्रांचे परीक्षण केले

Back to top button