America VS china : अमेरिका, चीन, तैवानमध्ये लष्करासाठी हाय अलर्ट जारी | पुढारी

America VS china : अमेरिका, चीन, तैवानमध्ये लष्करासाठी हाय अलर्ट जारी

तैपेई; वृत्तसंस्था : चीनच्या (America VS china) धमकीला न जुमानता तैपेईत ठरल्याप्रमाणे अमेरिकन ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह’च्या (संसदेचे सभागृह) अध्यक्षा नॅन्सी पेलोसी (Nancy Pelosi) यांचा दौरा सुरू झाला आहे. यूएस हवाई दलाच्या 24 प्रगत लढाऊ विमानांनी नॅन्सी यांच्या विमानाला एस्कॉर्ट केले. तत्पूर्वी, चीनसह अमेरिका आणि तैवाननेही आपापल्या सैन्य दलांसाठी हाय अ‍ॅलर्ट जारी केला.

नॅन्सी पेलोसी या तैवानची राजधानी तैपेई येथे दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या या दौर्‍याला चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आधीच हरकत घेतली होती. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी व्हर्च्युअल चर्चेतही, आगीशी खेळाल तर जळून खाक व्हाल, अशी थेट धमकी जिनपिंग यांनी दिली होती. (America VS china)

चीनचा युद्धसराव (America VS china)

उत्तरादाखल चीनने तैवान सीमेजवळ लष्करी सराव सुरू केला असून, अमेरिकेला अत्यंत गंभीर परिणाम भोगावे लागतील, या धमकीचा पुनरुच्चारही केला. अमेरिका, तैवान आणि चीन या तिन्ही देशांनी आपापल्या सैन्याला युद्धासाठी सज्ज राहण्यास सांगितले आहे.

अमेरिकन युद्धनौका सज्ज

अमेरिकन नौदलाच्या चार युद्धनौका हाय अलर्टवर असून तैवानच्या सागरी सीमेवर गस्त घालत आहेत. एफ-16 आणि एफ-35 सारखी अत्त्याधुनिक लढाऊ विमाने या नौकांवर सज्ज आहेत. रीपर ड्रोन आणि लेझर गाईडेड मिसाईल्सही तत्पर आहेत.

…तर अमेरिका, तैवान तुटून पडणार

चीनने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यास अमेरिका आणि तैवान दोन्ही बाजूंनी चीनवर हल्ला करू शकतात, अशी तयारी करण्यात आली आहे. चीननेही दीर्घ पल्ल्याचे हुडोंग रॉकेटस् सज्ज ठेवले आहेत. एका वृत्तानुसार पेलोसी यांच्या आगमनापूर्वीच अमेरिकन लष्कराचे एक पथक तैपेईत दाखल झालेले आहे.

Back to top button