China and Taiwan : तणाव वाढला! चीनची २१ विमाने तैवानच्या हद्दीत घुसली, अमेरिकेला दिला गंभीर परिणामांचा इशारा | पुढारी

China and Taiwan : तणाव वाढला! चीनची २१ विमाने तैवानच्या हद्दीत घुसली, अमेरिकेला दिला गंभीर परिणामांचा इशारा

तैपेई; पुढारी ऑनलाईन : अमेरिकन ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह’च्या (संसदेचे सभागृह) अध्यक्षा नॅन्सी पेलोसी (Nancy Pelosi) तैवान (Taiwan) दौऱ्यावर आहेत. याच दरम्यान मंगळवारी २० हून अधिक चिनी लष्करी विमानांनी तैवानच्या हवाई संरक्षण क्षेत्रात उड्डाण केले. अमेरिकेच्या हवाई दलाच्या २४ प्रगत लढाऊ विमानांनी नॅन्सी यांच्या विमानाला एस्कॉर्ट केले. तत्पूर्वी, चीनसह (China and Taiwan)

अमेरिका आणि तैवाननेही आपापल्या सैन्य दलांसाठी हाय अ‍ॅलर्ट जारी केला होता. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने ट्विटरवर केलेल्या निवेदनात म्हटले आहे: “२१ पीएलए विमानांनी २ ऑगस्ट २०२२ रोजी तैवानच्या नैऋत्य दिशेकडील हवाई क्षेत्रात प्रवेश केला.”

(China and Taiwan) चीनच्या धमक्या आणि इशाऱ्यांना न जुमानता मंगळवारी नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये (Taiwan) दाखल झाल्या आहेत. पेलोसी यांनी तैपेई येथे तैवानच्या राष्ट्रपती त्साई इंग-वेन यांची भेट घेतली. तैवानमध्ये लोकशाहीची भरभराट होत आहे. तैवानने आव्हाने असूनही आशा, धैर्य आणि दृढनिश्चयाने शांततापूर्ण आणि समृद्ध भविष्य घडवू शकते हे जगासमोर दाखवून दिले आहे. आता पूर्वीपेक्षा अधिक तैवानची अमेरिकेशी एकी महत्त्वाची आहे, हाच संदेश आज आम्ही देत आहोत, अशा भावना पेलोसी यांनी तैवान दौऱ्यादरम्यान व्यक्त केली. शांतता आणि स्थिरता राखण्यासाठी तैवान वचनबद्ध असल्याची ग्वाही तैवानच्या राष्ट्रपती त्साई इंग-वेन यांनी दिली आहे.

विशेष म्हणजे त्यांच्या या दौर्‍याला चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आधीच हरकत घेतली होती. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी व्हर्च्युअल चर्चेतही, आगीशी खेळाल तर जळून खाक व्हाल, अशी थेट धमकी जिनपिंग यांनी दिली होती.

उत्तरादाखल चीनने तैवान सीमेजवळ लष्करी सराव सुरू केला असून, अमेरिकेला अत्यंत गंभीर परिणाम भोगावे लागतील, या धमकीचा पुनरुच्चारही केला. अमेरिका, तैवान आणि चीन या तिन्ही देशांनी आपापल्या सैन्याला युद्धासाठी सज्ज राहण्यास सांगितले आहे.

अमेरिकन नौदलाच्या चार युद्धनौका हाय अलर्टवर असून तैवानच्या सागरी सीमेवर गस्त घालत आहेत. एफ-१६ आणि एफ-३५ सारखी अत्त्याधुनिक लढाऊ विमाने या नौकांवर सज्ज आहेत. रीपर ड्रोन आणि लेझर गाईडेड मिसाईल्सही तत्पर आहेत.

…तर अमेरिका, तैवान तुटून पडणार

चीनने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यास अमेरिका आणि तैवान दोन्ही बाजूंनी चीनवर हल्ला करू शकतात, अशी तयारी करण्यात आली आहे. चीननेही दीर्घ पल्ल्याचे हुडोंग रॉकेटस् सज्ज ठेवले आहेत. एका वृत्तानुसार पेलोसी यांच्या आगमनापूर्वीच अमेरिकन लष्कराचे एक पथक तैपेईत दाखल झालेले आहे.

Back to top button