

तैपेई/वॉशिंग्टन/बीजिंग ः वृत्तसंस्था सुरक्षिततेच्या मुद्द्यावर अमेरिका नेहमीच तैवानच्या सोबत आहे आणि राहील. आम्हाला तैवानसोबत मैत्रीचा अभिमान आहे, असे प्रतिपादन अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी केले. तैवान दौर्याच्या दुसर्या दिवशी बुधवारी त्यांनी तैवानच्या संसदेत भेट दिली. येथे त्यांची तैवानचा सर्वोच्च सन्मान 'ऑर्डर ऑफ प्रॉपिटियस क्लाऊडस् विथ स्पेशल ग्रँड कॉर्डन'ने गौरव करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.
चीनच्या वन चायना धोरणानुसार चीन तैवानला स्वतःचा भाग मानतो, तर तैवान स्वतःला स्वतंत्र देश मानतो. तैवानला आपल्या राजकीय मागण्यांसमोर झुकवणे आणि चीनचा ताबा मान्य करायला लावणे, हे चीनचे उद्दिष्ट आहे. विशेष म्हणजे, अमेरिकेचीदेखील वन चायना धोरणाला मान्यता आहे; पण तैवानवर बलपूर्वक चीनने ताबा मिळवणे, अमेरिकेला मान्य नाही.
राष्ट्राध्यक्षांचीही घेतली भेट
पेलोसी यांनी तैवानचे राष्ट्रपती साई इंग वेन यांचीही भेट घेतली. यावेळी वेन यांनी लष्करी संकटासमोर देश झुकणार नाही, असे स्पष्ट केले. पॅलोसी म्हणाल्या, अमेरिकेने 43 वर्षांपूर्वी तैवानसोबत राहण्याचे आश्वासन दिले होते. त्यावर अमेरिका आजही ठाम आहे.
तिआनमेन चौकातील नरसंहाराचाही उल्लेख
पेलोसी यांनी संसदेच्या उपसभापती साई ची चांग यांचीही भेट घेतली. यावेळी त्यांनी चीनमधील तियानमेन चौकातील नरसंहाराचा उल्लेख करताना मानवाधिकारांच्या रक्षणासाठी अमेरिकेचे पाठबळ नेहमी मिळेल, असे स्पष्ट केले. ही नरसंहाराची घटना चीनची दुखरी नस असून त्यावरच नेमके पेलोसी यांनी बोट ठेवले. त्यामुळे चीनची आणखी चिडचिड होऊ शकते.
चीनने तैवानचा नैसर्गिक वाळू पुरवठा रोखला
पॅलोसींच्या तैवान दौर्याने जळफळाट झालेल्या चीनने तैवानला आर्थिक अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. चिनी सरकारने तैवानला नैसर्गिक वाळू देणे थांबवले आहे. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने ही माहिती दिली. कोरोना महारोगराईनंतर बांधकाम आणि पायाभूत सुविधा विकास हा तैवानसाठी एक उत्पन्नाचा मार्ग बनला आहे. त्यामुळे चीनने वाळू निर्यात थांबविल्याने तैवानचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. 1 जुलैलादेखील चीनने तैवानच्या 100 हून अधिक खाद्यान्नांच्या आयातीवर बंदी घातली होती.
अमेरिकेच्या युद्धनौका तैवानच्या समुद्रात
अमेरिकन नौदलाच्या चार युद्धनौका हाय अलर्टवर असून या युद्धनौका तैवानच्या समुद्री सीमेत गस्त घालत आहेत. या युद्धनौकांवर एफ-16 आणि एफ-35 यासारखी अत्याधुनिक लढाऊ विमाने तसेच क्षेपणास्त्रे आहेत. यावर रीपर ड्रोन आणि लेझर गायडेड क्षेपणास्त्रेही तैनात आहेत. चीनने काही आगळीक केली, तर अमेरिकेच्या या युद्धनौका आणि तैवान असे दोन्हीकडून चिनी हल्ल्याला प्रत्युत्तर मिळू शकते.
उत्तर कोरियाकडून निषेध
उत्तर कोरियाने पेलोसी यांच्या तैवान भेटीचा निषेध केला. अमेरिका चीनच्या अंतर्गत मुद्द्यात दखल देत असल्याचे उ. कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. दरम्यान, 25 वर्षांनंतर प्रथमच अमेरिकन संसदेच्या सभापती तैवान दौर्यावर गेल्या आहेत. 1997 मध्ये सभापती न्यूट गिंगरिक यांनी तैवान दौरा केला होता.
हेही वाचा