काबूल; पुढारी ऑनलाईन : अफगाणिस्तान वर तालिबाननं कब्जा केल्यानंतर काबूल शहरातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. अफगाणिस्तान सोडून जाण्यासाठी काबूल विमानतळावर नागरिकांची मोठी गर्दी उसळली आहे. येथे गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, तालिबानने अफगाणिस्तानातील युद्ध संपल्याचे जाहीर करत शासन व्यवस्थेबाबत लवकरच माहिती देणार असल्याचे म्हटले आहे.
गोळीबारानंतर काबूल विमानतळावर मोठा गोंधळ उडाला आहे. लोक आपला जीव वाचवण्यासाठी धडपडत आहेत. यात अनेक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत काबूल विमानतळावरील परिस्थिती भयावह दिसून येत आहे.
अफगाणिस्तानातून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अमेरिकेचे प्रयत्न सुरु आहेत. अफगाणिस्तानातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याच्या पार्श्वभूमीवर आज सोमवारी सकाळी १० वाजता संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने तातडीने बैठक बोलावली आहे. याआधीही संयुक्त राष्ट्राने अफगाणिस्तानातील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली होती.
तालिबानने बगराम एयरबेसदेखील ताब्यात घेतला आहे. या एयरबेसवर तैनात असलेल्या अफगाण सैन्याने तालिबानसमोर शरणागती पत्करली असल्याची माहिती पुढे आली आहे.
या एयरबेसवर मोठ्या संख्येने कैद्यांना ठेवण्यात आले होते. कधीकाळी या एयरबेसवर अमेरिकेचा सर्वांत मोठा सैन्य तळ होता. त्यावर आता तालिबानने कब्जा केला आहे.
तालिबानने अफगाणिस्तानातील बहुतांश शहरांवर कब्जा केला आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घणी देश सोडून पळून गेले आहेत. ते उझबेकिस्तानला गेले असल्याचे समजते.
तालिबानी सैन्य सध्या काबूल शहरात घुसले आहे. अफगाण सैन्यदलाने आधीच माघार घेतली आहे.
तालिबानने लोकांना १७ ऑगस्टच्या ८ वाजेपर्यंत घरातच रहावे, असे आवाहन केले आहे. काबुल विमानतळावरील व्यावसायिक विमान उड्डाने बंद करण्यात आली आहेत. केवळ सैन्य विमानांना उड्डाणासाठी परवानगी देण्यात आली आहे. यामुळे विमानतळावर मोठा गोंधळ उडाला आहे.
हे ही वाचा :