

वेल्हे ; पुढारी वृत्तसेवा : पानशेत धरण परिसरात कार कोसळून महिलेचा बुडून मुत्यू झाला. समृद्धी योगेश देशपांडे (रा.शनिवार पेठ पुणे) असे त्यांचे नाव. योगेश देशपांडे आणि त्यांचा मुलगा चिराग देशपांडे यांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. आज (दि.१५) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कादवे (ता.वेल्हा जि.पुणे) येथे ही दुर्घटना घडली.
याबाबत माहिती अशी, पानशेत-शिरकोली रस्त्यावर कादवे गावच्या शंभर मीटर अंतरावर कठडे नसलेल्या पुलावरून कार थेट पानशेत धरण परिसरात कोसळली.
कार कोसळताच योगेश देशपांडे हे तात्काळ बाहेर पडले. त्यांना पोहता येत असल्याने त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता पोहत जाऊन पुढील सिटवर बसलेल्या चिरागला बाहेर काढले.
गाडीचा आवाज ऐकून जवळील हॉटेलचे मालक वैभव जागडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
कारमध्ये पाणी गेल्याने कारचा पाठीमागील दरवाजा उघडता आला नाही.
समृद्धी यांना बाहेर काढण्यासाठी योगेश देशपांडे व वैभव जागडे यांनी खोल पाण्यात धाव घेतली.
पाठीमागच्या दरवाजाची काच तोडून बेशुद्ध अवस्थेत समृद्धी यांना बाहेर काढले.
गणेश फाळके यांच्या कारमधून समृद्धी यांना पानशेत येथील एका खासगी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मुत्यु झाला होता.
स्थानिक तरुण आदित्य लोणारे, गणेश फाळके, तुषार जागडे ,नामदेव काटकर आदींनी समृद्धी यांचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
पानशेत पोलिस चौकीचे अजय साळुंखे, राजाराम होले ,योगेश गरुड यांच्या पथकाने दवाखान्यात धाव घेतली.
समृध्दी यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यात आला.
कारचा टायर फुटल्याने गाडी रस्त्यावरून घसरत जाऊन पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोसळली, अशी माहिती वेल्हे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पवार यांनी सांगितले.
पानशेतपासून पाच किलोमीटर मीटर अंतरावर पानशेत धरणाच्या तिरावरुन पानशेत -कादवे – शिरकोली, वेल्हे रस्ता जातो. कादवे गावाजवळ धरणाच्या तिरावर कस्तुरी हाँटेल आहे.
आज दुपारी दीड वाजता योगेश देशपांडे, त्यांच्या पत्नी व मुलगा असे तिघे जण हाँटेलमध्ये आले. तिघांनी कांदाभजी खाल्ली. त्यानंतर तेथूनच कार माघारी वळवून ते पुण्याकडे चालले होते.
वैभव जागडे म्हणाले, हाँटेलमध्ये भजी खाल्यानंतर योगेश देशपांडे यांनी समोरच कार वळवली. तिघेही कारमधून गेले.
काही क्षणातच मोठा आवाज आला. आम्ही घटनास्थळी धाव घेतली.
योगेश यांनी पोहत मुलाला बाहेर काढून आमच्याकडे फेकले. नंतर पत्नीला बाहेर काढण्यासाठी बंद दरवाजा न उघडल्याने वेळ गेला. त्यात समृद्धी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
हेही वाचलं का ?