

पुढारी ऑनलाईन डेस्क: तालिबानने अफगाणिस्तानातील बहुतांश शहरांवर कब्जा केल्यनांतर अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घणी देश सोडून पळून गेले आहेत.
तालिबानी सैन्य सध्या काबूल शहराच्या सीमांवर असून अफगान सैन्यदलाने आधीच माघार घेतली आहे.
अफगाणिस्तानाच्या बहुतांश शहरांवर कट्टरपंथी तालिबानी सैन्यांनी कब्जा घेतला आहे. रविवारी काबूल शहराच्या सीमेवर तालिबानी आल्यानंतर सत्ता हस्तांतरणाबाबत चर्चा सुरू होती. तर दुसरीकडे जर सत्ता हस्तांतर झाली नाही तर हल्ल्याची धमकीही दिली जात होती.
अफगाणिस्तानच्या अधीकृत मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, तालिबानी काबूलच्या सीमेवर असून ते अद्याप आत घुसलेले नाहीत. काबूलच्या जिल्ह्यांमध्ये स्पेशल पोलिस युनिट तैनात केले आहेत.
जेणेकरून या संधीचा फायदा घेऊन सामान्यांना कुणी त्रास देणार नाही. संशयास्पद व्यक्तींना थेट गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत.
अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह म्हणाले की, आम्ही तालिबान्यांशी कधीच हातमिळवणी करणार नाही.
आम्ही तालिबान्यांसमोर कधीच झुकणार नाही. मी लाखो लोकांना निराश करणार नाही. या लोकांनी माझ्यावर भरवसा ठेवला.
दुसरीकडे अफगाणिस्ताचे माजी राष्ट्रपती हमीद करजई यांनी लोकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे.
अजून चर्चेतून मार्ग निघू शकतो असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घणी यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत देश सोडल्याचे वृत्त एका वाहिनीने दिले आहे. सध्या परदेशातील हजारो नागरिक काबूलच्या विमानतळावर आले असून ते देश सोडण्याच्या तयारीत आहेत.
अमेरिकन नागरिकांच्या सुटकेसाठी अमेरिका पाच हजार सैन्य पाठवून देणार असल्याचे जाहीर केले आहे.
याआधी, अफगाणिस्तानात आता राजधानी काबूल वगळता बाकीच्या सर्व महत्त्वाच्या शहरांवर तालिबानने ताबा मिळवला आहे.
आतापर्यंत सरकारच्या नियंत्रणात असलेलं मजार-ए-शरीफ हे उत्तर अफगाणिस्तानातलं मोठं शहर आता तालिबानच्या ताब्यात गेले आहे.
तालिबानला विरोध करणारे उझबेक सेनानी अब्दुल रशीद दोस्तूम आणि ताजिक नेता अट्टा मोहम्मद नूर यांनी या प्रांतातून पलायन केले.
त्यांनी सुरक्षित स्थळी आश्रय घेतल्याचे समजते.
हेही वाचा: