‘लश्‍कर-ए-तोयबा’चा मी मोठा समर्थक : मुशर्रफ | पुढारी

'लश्‍कर-ए-तोयबा'चा मी मोठा समर्थक : मुशर्रफ

नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन

पाकिस्‍तानचे माजी अध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनी लष्‍कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा मोठा समर्थक असल्‍याचे म्‍हटले आहे. त्‍यांनी एका पाकिस्‍तानी वृत्तवाहिनीशी बोलताना हा खळबळजनक खुलासा केला आहे. इतकेच नाही तर ‘लश्‍कर-ए-तोयबा’चा म्‍होरक्‍या आणि मुंबईवरील २६/११ हल्‍ल्‍याचा मास्‍टरमाइंड हाफीज सईदला मी भेटलो आहे आणि त्‍याचे मी समर्थन करतो, असेही मुशर्रफ यांनी म्‍हटले आहे. 

लश्‍कर-ए-तोयबा काश्‍मीरमध्‍ये असून, ‘लश्‍करा’चेही मला समर्थन असल्‍याचे मुशर्रफ यांनी कबूल केले आहे. मुशर्रफ एवढेच बोलून थांबले नाहीत, फुत्‍कार सोडत ते म्‍हणाले, ‘मी लश्‍कर-ए-तोयबाचा मोठा समर्थक आहे आणि मला महित आहे की, ते मला पसंत करतात. ‘जमात-उद-दावा’देखील माझे समर्थन करते.’ 

लाहोर उच्‍च न्‍यायालयाच्या आदेशानंतर दहशतवादी हाफीज सईदला अटक करण्‍यात आली अटक करण्‍यात आली होती. त्‍यानंतर ऑगस्‍टमध्‍ये पाकिस्‍तानने सईदला फरार घोषित केले होते. हाफीज सईदला संयुक्‍त राष्‍ट्र संघाने दहशतवादी म्‍हणून घोषित केले आहे. मुंबईवरील २००८च्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यानंतर अमेरिकेने सईदवर १० कोटींचे बक्षीसही ठेवले होते. असे सांगून मुशर्रफ म्‍हणाले, ‘हाफीज सईद मुंबईवर झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यात सहभागी नव्‍हता. कारण, सईदने स्‍वत: हे आरोप नाकारले आहेत.’ आम्‍ही ‘लश्‍कर’वर निर्बंध घातले. कारण त्‍यावेळची परिस्‍थिती वेगळी होती. आमची शांततेच्‍या दिशेने वाटचाल होती. मात्र, भारतीय सेनेवर दबाव आणण्‍यासाठी विशेषत: काश्‍मीरमध्‍ये ‘लश्‍करा’ची मोठी ताकद आहे, असेही परवेझ मुशर्रफ यांनी म्‍हटले आहे. 

Back to top button