पाकिस्तानचा ‘डबलगेम’ खपवून घेणार नाही : अमेरिका | पुढारी

पाकिस्तानचा 'डबलगेम' खपवून घेणार नाही : अमेरिका

वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन

पाकिस्तानची कोट्यवधील डॉलर्सची मदत रोखल्याच्या मुद्यावर आज, अमेरिकेने आपली भूमिका स्पष्ट केली. अफगाणिस्तानमधील अमेरिकेच्या तळांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना पाकिस्तानने आश्रय दिला. पाकिस्तानने वर्षानुवर्षे हा डबलगेम खेळला आहे. पण, आता हे खपवून घेतले जाणार नाही, असे अमेरिकेने स्पष्ट केले. संयुक्त राष्ट्रांतील अमेरिकेच्या राजदूत निक्की हेली यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे. 

हेली म्हणाल्या, ‘पाकिस्तानने सातत्याने दहशतवादाला पाठिंबा दिल्यामुळेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानची मदत रोखली आहे. मदत रोखण्याचे हेच स्पष्ट कारण आहे.अनेक वर्षांपासून पाकिस्तानने आमच्यासोबत काम केले आहे आणि त्याचवेळी त्यांनी दहशतवाद्यांना पाठिंबाही दिला आहे. अगदी अफगाणिस्तानात अमेरिकन सैन्यावर हल्ला करणाऱ्यांनाही त्यांनी आश्रय दिला. पण, आता अमेरिकन प्रशासन हे खपवून घेणार नाही. दहशतवाद विरुद्ध लढण्यासाठी आम्हाला पाकिस्तानचे आणखी सहकार्य अपेक्षित आहे.’

पाकिस्तान दहशतवादाविरोधात लढू शकतो. त्यांनी ठोस पावले उचलावीत, अशी आमची अपेक्षा आहे. येत्या २४ ते ४८ तासांत आपल्याला अशी ठोस पावले पहायला मिळतील, अशी अपेक्षा  व्हाईट हाऊसच्या प्रसिद्धी सचिव साराह सँडर्स यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. 
 

Back to top button