भारताची सहमती असेल तरच काश्मीरप्रश्नी मध्यस्थी | पुढारी

भारताची सहमती असेल तरच काश्मीरप्रश्नी मध्यस्थी

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था

भारताची सहमती असेल तरच काश्मीरप्रश्नी आपण मध्यस्थी करू, अशी भूमिका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्रम्प यांची भेट घेऊन काश्मीर प्रश्नी मध्यस्थी करण्याची विनंती केली. ट्रम्प यांनी मात्र पाकिस्तानसह भारताने सहमती दर्शविली तरच आपण मध्यस्थी करू, असे स्पष्टपणे सांगितले.  ट्रम्प यांच्या भूमिकेमुळे इम्रान यांचा भ्रमनिरास झाला आहे. ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमात ट्रम्प हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत होते. त्यानंतर ट्रम्प यांनी 24 तासांच्या आतच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या उपस्थितीत हे भाष्य केले आहे. ट्रम्प यांनी इम्रान यांच्या समक्षच हाऊडी मोदी कार्यक्रमाचे कौतुक केले. 

यावेळी  ट्रम्प म्हणाले, पंतप्रधान मोदींसोबत हाऊडी कार्यक्रमात होतो. मी त्यांचे आक्रमक भाषण ऐकले. लोकांनीही मोदी यांचे भाषण आवडल्याचे त्यांनी यावेळी नमूद कले.  ट्रम्प या मध्यस्थीच्या प्रस्तावावर भाष्य करण्यास परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविशकुमार यांनी नकार दिला. पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यात संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेआधी द्विपक्षीय चर्चा होणार आहे. 

पाकला सहकार्य केल्याने मोदींची चीनवर टीका

दहशतवादाच्या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्र किंवा टेरर फंडिंग रोखणार्‍या फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) तर्फे लागू होणार्‍या निर्बंधाच्या कारवाईवरून राजकारण व्हायला नको. उलट, त्यांची कार्यप्रणाली चांगल्या पद्धतीने लागू केली गेली पाहिजे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे नाव न घेता टीका केली आहे. 

संयुक्त राष्ट्राच्या महासभेत सहभागी होण्यासाठी आलेल्या मोदींनी एका कार्यक्रमात वरील मत व्यक्त केले.  मोदी म्हणाले, जगभरात कुठेही दहशतवादी हल्ला झाला तरी त्याकडे पाहताना चांगला किंवा वाईट दहशतवाद अशा नजरेतून न पाहता केवळ दहशतवादी हल्ला म्हणूनच पाहिले पाहिजे. दहशतवाद्यांना त्यांचे वाईट हेतू साध्य करण्यासाठी पैसे आणि शस्त्रे मिळायला नकोत. उलट, हे रोखणार्‍या संस्थांची कार्यपद्धती अद्ययावत झाली पाहिजे. यामुळे द्विपक्षीय आणि क्षेत्रीय स्तरावर सर्व देशांत सहकार्य आणि गुप्त माहितीची देवाण-घेवाण सहजशक्य होईल. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी लोकशाही मूल्ये, वैविध्य आणि समग्र विकासाचा फॉर्म्युला पंतप्रधानांनी दिल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव गीतेश शर्मा यांनी पत्रकारांना सांगितले.

Back to top button