कोरोनामुळे स्पेनच्या राजकुमारीचा मृत्यू | पुढारी | पुढारी

कोरोनामुळे स्पेनच्या राजकुमारीचा मृत्यू | पुढारी

माद्रिद (स्पेन) : पुढारी ऑनलाईन

कोरोना व्हायरसमुळे युरोपातील अनेक देशांत हाहाकार उडाला आहे. स्पेनमध्येही कोरोनामुळे आतापर्यंत ५,९८२ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या विळख्यातून राज घराण्यातील व्यक्तीही सुटलेल्या नाहीत. स्पेनची राजकुमारी मारिया टेरेसा यांचे कोरोनाची बाधा झाल्याने निधन झाले आहे. कोरोनामुळे राजघराण्यातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होण्याची जगातील ही पहिलीच घटना आहे. याआधी ब्रिटनचे राजकुमार चार्ल्स यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे वृत्त आले होते.

स्पेनचे राजे फिलिप सहावे यांची गेल्या आठवड्यात कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यानंतर आठवडाभरानंतर स्पेनच्या राजकुमारी मारिया टेरेसा यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. 

स्पेनच्या राजकुमारी मारिया टेरेसा ह्या ८६ वर्षाच्या होत्या. राजकुमारी मारिया ह्या स्पेनचे राजे फिलीप सहावे यांच्या चुलतबहीण होत्या. त्यांच्या मृत्यूची माहिती राजघराण्याकडून फेसबुक पोस्टद्वारे देण्यात आली आहे. 

राजकुमारी मारिया यांचा जन्म २८ जुलै १९३३ रोजी झाला. त्यांनी शिक्षण फ्रान्समध्ये घेतले होते. त्यानंतर त्या पॅरिस येथील विद्यापिठात प्राध्यापक म्हणून काम करत होत्या. स्वतंत्र विचार आणि सामाजिक कार्यामुळे मारिया यांची जनसामान्यात वेगळी ओळख होती. गेल्या शुक्रवारी माद्रिद येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

Back to top button