चीनमधील कोरोनाबाबत ‘डब्ल्यूएचओ’नं केला मोठा खुलासा | पुढारी

चीनमधील कोरोनाबाबत 'डब्ल्यूएचओ'नं केला मोठा खुलासा

जिनिव्हा : पुढारी ऑनलाईन

कोरोना व्हायरसबाबत सतर्कता राखली नसल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेवर (डब्ल्यूएचओ) जगभगरातून टीका होत आहे. यावरुन डब्ल्यूएचओने मोठा खुलासा केला आहे. वुहानमध्ये न्युमोनिया सारख्या प्रकरणाबाबत पहिल्यांदा चीनने नव्हे तर डब्ल्यूएचओच्या कार्यालयाने सूचना दिली होती, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

वाचा : देशात एका दिवसात २२ हजारांहून अधिक रूग्ण

डब्ल्यूएचओवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत आरोप करत आहेत. ही संयुक्त राष्ट्रसंघाची संस्था कोरोना महामारीची सूचना देण्यास अपयशी ठरली असून ती चीनला खूश ठेवण्याचे काम करत आहे, असा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. डब्ल्यूएचओने हे आरोप फेटाळून लावले आहेत.    

जगभरातून होत असलेल्या टिकेनंतर डब्ल्यूएचओने ९ रोजी प्रसिद्ध केलेल्या सुरुवातीच्या संवादाची टाइमलाइन प्रकाशित केली आहे. या घटनाक्रमानुसार डब्ल्यूएचओने म्हटले होते की हुबेई प्रांतातील वुहान पालिकेच्या आरोग्य आयुक्तालयाने ३१ डिसेंबर रोजी न्युमोनियाची ३१ प्रकरणे नोंदवली. मात्र, आरोग्य संघटनेने कोणाला याची सूचना दिली हे स्पष्ट केले नाही.

वाचा : टिकटॉक बंदी; ‘या’ कंपनीचे ४५ हजार कोटींचे नुकसान!

डब्ल्यूएचओचे संचालक ट्रडोस अधानोम घेब्रेयेसस यांनी २० एप्रिल रोजी पत्रकार परिषद घेऊन चीनमध्ये पहिला रुग्ण आढळून आल्याची माहिती दिली होती. हा अहवाल चिनी अधिकारी किंवा अन्य स्रोतांकडून पाठविला गेला आहे की नाही  हे स्पष्ट केले नव्हते. मात्र आता आरोग्य संघटनेने नुकताच नवीन घटनाक्रम प्रसिद्ध केला आहे. त्यावरून डब्‍ल्‍यूएचओच्या चीनमधील कार्यालयानेच ३१ डिसेंबर रोजी न्युमोनियाबाबत पहिल्यांदा माहिती दिल्याचे संकेत मिळत आहेत. डब्‍ल्‍यूएचओच्या चीनमधील कार्यालयाला वुहान हेल्थ कमिशनच्या वेबसाईटवरुन याची माहिती मिळाली होती. त्याच दिवशी डब्‍ल्‍यूएचओच्या महामारीबाबतच्या सर्व्हेलान्स नेटवर्कला वुहानमध्ये न्युमोनियाची प्रकरणे आढळून आल्याचा आणखी एका रिपोर्ट मिळाला होता. यानंतर डब्ल्यूएचओने चीन प्रशासनाला याबाबत १ आणि २ जानेवारी रोजी असे दोनवेळा विचारले तेव्हा त्यांनी ३ जानेवारी माहिती पुरवली.

दरम्यान, एखाद्या घटनेची पुष्टी करण्यासाठी आणि त्याची संस्थेला माहिती देण्यासाठी कोणत्याही देशाकडे २४ ते ४८ तासांचा अवधी असतो, अशी माहिती डब्ल्बूएचओच्या आपात्कालीन कार्यक्रमाचे संचालक मिशेल रेयान यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली होती.

 

Back to top button