Good Country Index : जगातील सर्वांत चांगल्या देशांच्या यादीत स्वीडन दुसऱ्यांदा टॉपवर, जाणून घ्या भारत कितव्या स्थानी? | पुढारी

Good Country Index : जगातील सर्वांत चांगल्या देशांच्या यादीत स्वीडन दुसऱ्यांदा टॉपवर, जाणून घ्या भारत कितव्या स्थानी?

पुढारी ऑनलाईन

Good Country Index : जगासाठी योगदान देणाऱ्या देशांच्या यादीत पहिल्या टॉप १० मध्ये युरोपीय देशांचे स्थान कायम आहे. गुड कंट्री इंडेक्स नावाच्या निर्देशांकाच्या नवव्या आवृत्तीने स्वीडन देशाला सलग दुसऱ्यांदा १६९ देशांच्या यादीत पहिले स्थान दिले आहे. या यादीत डेन्मार्क दुसऱ्या, जर्मनी तिसऱ्या, नेदरलँड चौथ्या, फिनलँड पाचव्या, कॅनडा सहाव्या, बेल्जियम सातव्या, आयर्लंड आठव्या, फ्रान्स नवव्या आणि ऑस्ट्रिया दहाव्या स्थानी आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञान, संस्कृती, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा, हवामान, समृद्धी आणि आरोग्य क्षेत्रातील जागतिक योगदानाच्या आधारावर देशांचे मूल्यांकन केले गेले आहे. ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड अनुक्रमे १४, १८ आणि १९ व्या स्थानी आहेत. गुड कंट्री इंडेक्समध्ये अमेरिकेचे स्थान ४६ वे आहे. तर भारत ५२ व्या स्थानावर आहे. याआधीच्या Good Country Index च्या तुलनेत भारत एक स्थान वर आहे.

Good Country Index वर देशाचे स्थान निश्चित करण्यासाठी विविध स्त्रोतांकडून आलेल्या विश्वासार्ह डेटाचा वापर केला जातो. देशाचे स्थान ठरविण्यासाठी शांतता आणि सुरक्षेतील योगदान, एखाद्या देशाने संयुक्त राष्ट्रांना पाठवलेल्या शांतीसेना पथकांची संख्या विचारात घेतली जाते.

या इंडेक्सच्या म्हणण्यानुसार, “आम्ही उपलब्ध असलेल्या सर्वात विश्वासार्ह डेटाचा वापर करतो. प्रत्येक देश स्वतःच्या सीमेबाहेरील, सकारात्मक आणि नकारात्मक, बाह्य प्रभावांवर अहवाल देते.” गुड कंट्री इंडेक्सची कल्पना सोपी आहे. पृथ्वीवरील प्रत्येक देश मानवतेच्या दृष्टीकोनातून काय योगदान देतो, याचेही मोजमाप केले जाते. त्यातून देशाचे स्थान ठरवले जात असल्याचे Good Country Index ने म्हटले आहे.

हे ही वाचा :

Back to top button