

नागपूर ; पुढारी वृत्तसेवा : ईडीच्या ताब्यात असलेले अॅड सतीश उके यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात निवडणूकी संदर्भात नागपूर हायकोर्टात याचिका दाखल केल्या आहेत. तर नागपूरात मृत्यू झालेले अॅड. लोया यांच्या मृत्यूप्रकरणी चौकशीची ही मागणी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणूक लढविताना त्यांनी शपथपत्रात काही माहिती लपविल्याचा आरोप सतीश उके (satish uke) यांनी याचिकेतून केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर दाखल असलेल्या दोन गुन्ह्यांची माहिती त्यांनी लपविली असल्याचे अॅड उके यांचे म्हणणे आहे. तर न्यायाधीश लोया मृत्यूप्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी त्यांनी मुंबई नागपूरात पत्रकार परिषदा घेतल्या आहेत. गडकरी यांच्या विरोधातही त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे.
अॅड. सतीश उके यांच्या नागपुरातील पार्वतीनगर येथील घरी गुरुवारी सकाळी ईडीने छापा टाकला. ईडीच्या या कारवाईमुळे वकील व राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ईडीने कोणत्या कारणाने छापा टाकला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
भूखंड व्यवहारातील आर्थिक प्रकरणाच्या तपासासाठी ईडीने ही धाड टाकल्याचे सांगण्यात येते. गेल्या काही वर्षांपासून उके यांनी भाजप नेत्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्या. तसेच पत्रकार परिषदेच्या माध्यमातूनही ते भाजप नेत्यांवर आरोप करीत आहेत.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील, अशीही त्यांची ओळख आहे. गुरुवारी सकाळी ७ च्या सुमारास ईडीचे मुंबईतील पथक केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांसह उके यांच्या घरी धडकले. पथकात महिला अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
गेल्या दोन तासांपासून ईडी उके यांच्या घराची झडती घेत असून त्यांची चौकशी करीत होते. ईडीचे अधिकारी त्यांना घेऊन सेमिनरी हिल्स येथील ईडीच्या कार्यालयात घेऊन गेले आहेत. तिथे त्यांची चौकशी करण्यात येत आहे.