उत्तर कोरियाला प्रत्युत्तर म्हणून दक्षिण कोरियाने अनेक क्षेपणास्त्रे डागली | पुढारी

उत्तर कोरियाला प्रत्युत्तर म्हणून दक्षिण कोरियाने अनेक क्षेपणास्त्रे डागली

सेऊल पुढारी ऑनलाईन डेस्क

उत्तर कोरियाच्या (North Korea) क्षेपणास्त्र चाचण्यांना प्रत्युत्तर म्हणून दक्षिण कोरियाने (South Korea) अनेक क्षेपणास्त्र चाचण्या घेतल्या असल्याचे वृत्त आहे. उत्तर कोरियाने ज्या ठिकाणी क्षेपणास्त्र डागले त्या ठिकाणांवर प्रतिहल्ला करण्यास आम्ही सज्ज आणि सक्षम असल्याचे दक्षिण कोरियाच्या लष्कराने म्हटले आहे.

दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ ऑफ स्टाफ ( (JCS) च्या म्हणण्यानुसार, उत्तर कोरियाच्या ताज्या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या (आयसीबीएम) चाचणीला प्रत्युत्तर म्हणून दक्षिण कोरियाच्या सैन्याने गुरुवारी लाइव्ह फायर सराव केला. यादरम्यान अनेक क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्यात आली.

उत्तर कोरियाने प्योंगयांग जवळील सुनान भागात आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र चाचणी घेतल्यानंतर दक्षिण कोरियानेदेखील पूर्वेकडील समुद्रात क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेतल्या आहेत. थेट फायरद्वारे, आमच्या सैन्याने तत्काळ प्रत्युत्तर आणि प्रत्युत्तराची क्षमता असल्याचे दाखवून दिले आहे. जमिनीवरुन जमिनीवर मारा करणारे एक बॅलेस्टिक क्षेपणास्त्र, जहाजावरून जमिनीवर मारा करणारे एक क्रूझ क्षेपणास्त्र आणि हवेतून जमिनीवर मारा करणारे दोन जॉइंट डायरेक्ट अटॅक मुनिशन (JDAM) क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेण्यात आल्याची माहिती दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ ऑफ स्टाफने दिली आहे.

अण्वस्त्रांचा विकास करणे हाच उत्तर कोरियाचा एक कलमी राष्ट्रीय कार्यक्रम आहे. २०१६ ते २०१८ या काळात उत्तर कोरियाने ९० पेक्षा अधिक अणुचाचण्या केल्या आहेत. यामागे चीनचा अप्रत्यक्षपणे हात असल्याची माहिती पुढे आली होती. जागतिक दबाव असतानाही गेल्या वर्षभरात उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचणीचे कार्यक्रम सुरूच ठेवले आहेत. देशाचे सैन्यबळ आणखी शक्तिशाली आणि सामर्थ्यवान करण्यावर उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग-उन यांचा भर अधिक आहे.

हे ही वाचा :

Back to top button