Ukraine crisis : लुहांस्‍क आणि डोनेस्‍टक प्रांत स्‍वतंत्र देश : पुतीन यांची घोषणा, भारताने व्‍यक्‍त केली चिंता

#UkraineRussia
#UkraineRussia

नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन
रशिया आणि युक्रेनमधील संघर्षाचा भडका उडला आहे. ( Ukraine crisis ) रशियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष ब्‍लादिमीर पुतीन यांनी युक्रेनचे लुहांस्‍क आणि डोनेस्‍टक या दोन प्रांतांना स्‍वतंत्र देशाचा दर्जा दिला आहे. तसेच या दोन्‍ही प्रांतातील फुटीरवाद्‍यांच्‍या ताब्‍यात असलेल्‍या परिसरात रशियन लष्‍कर तैनात करण्‍यास सुरुवात केली आहे.

Ukraine crisis : सुरक्षा परिषद बैठकीत भारताने व्‍यक्‍त केली तीव्र चिंता

पुतीन यांनी घेतलेल्‍या निर्णयामुळे संयुक्‍त राष्‍ट्र सुरक्षा परिषदेने तातडीचे बैठक बोलवली. यामध्‍ये बैठकीत रशियाने घेतलेल्‍या निर्णयावर भारताने तीव्र चिंता व्‍यक्‍त केली. यावेळी भारताचे प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ति म्‍हणाले की, " रशियाने घेतलेल्‍या निर्णयामुळे शांतता आणि सुरक्षा याचा भंग होण्‍याची शक्‍यता आहे. या दोन्‍ही देशांनी आपआपसातील मतभेद हे चर्चेच्‍या माध्‍यमातूनच सोडवणे गरजेचे आहे ".

Ukraine crisis : घुसखाेरी केल्‍यास रशियाला सडेतोड उत्तर: अमेरिका

रशियाने युक्रेनमधील लुहांस्‍क आणि डोनेस्‍टक या दोन प्रांतांना स्‍वतंत्र देशाचा दर्जा दिला आहे. युक्रेनमध्‍ये घुसखोरी करण्‍यासाठीच रशियाने हा निर्णय घेतला आहे. रशियाने असा घुसखोरीचा प्रयत्‍न केल्‍यास आम्‍ही लवकरच त्‍यांना सडेतोड उत्तर देवू . आता अशी वेळ आली आहे की, केवळ किनार्‍यावर बसून पाहता येणार नाही, असा इशारा अमेरिकेने रशियाला दिला आहे.

आम्‍ही कोणालाही घाबरत नाही : युक्रेन

सुरक्षा परिषदेच्‍या बैठकीत युक्रेनच्‍या राजदूत सर्गेई किस्‍लिटस्‍या यांनी सांगितले की, "या प्रश्‍नी आम्‍ही चर्चेतून मार्ग काढण्‍यासाठी प्रयत्‍नशील आहे. आम्‍ही कोणत्‍याही दबावासमोर झुकणार नाही. आम्‍ही रशियाला चर्चा करण्‍याचे पुन्‍हा एकदा आवाहन करतो. तसेच युक्रेनच्‍या भूभागावर सैनिक तैनात करण्‍याच्‍या रशियाच्‍या निर्णयाचा आम्‍ही निषेध करतो", असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. तर राष्‍ट्राला संबोधित करताना युक्रेनचे राष्‍ट्राध्‍यक्ष क्‍लोडिमिर जेलेंस्‍की म्‍हणाले की, "आम्‍ही आमचे अविभाज्‍य भाग असलेल्‍या लुहांस्‍क आणि डोनेस्‍टक प्रांतांबाबत कोणतेही तडजोड करणार नाही. आम्‍ही कोणालाही घाबरत नाही. आम्‍हाला पाश्‍चात्‍य देशांची मदत मिळेल, अशी आशा आहे."

अमेरिकेच्‍या भूमिकेमुळे कठोर निर्णय घ्‍यावेच लागतील : रशिया

सुरक्षा परिषदेत बोलताना रशियाने स्‍पष्‍ट केले की, "युक्रेनबरोबर आम्‍ही चर्चा करण्‍यास तयार आहोत. मात्र आम्‍ही डोनबास परिसरात रक्‍तरंजित संघर्ष करण्‍याची आमची इच्‍छा नाही. या प्रश्‍नी अमेरिकेच्‍या नेतृत्‍वाने घेतला निर्णय हा नकारात्‍मक आहे. त्‍यामुळेच आम्‍हाला कठोर निर्णय घ्‍यावे लागत आहेत".

अमेरिका आणि ब्रिटन करणार रशियाविरोधात कारवाई?

रशियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष ब्‍लादिमीर पुतीन यांनी युक्रेनचे लुहांस्‍क आणि डोनेस्‍टक या दोन प्रांतांना स्‍वतंत्र देशाचा दर्जा दिला आहे. या निर्णयाचा अमेरिकेने तीव्र निषेध केला आहे. व्‍हाईट हाउसमधील माध्‍यम सचिव जेन साकी यांमी म्‍हटले आहे की, "रशिया आणि युक्रेन संघर्षाबाबत अमेरिकेचे राष्‍ट्रपती ज्‍यो बायडेन आदेश जारी करतील. लुहांस्‍क आणि डोनेस्‍टक प्रांतात अमेरिकेतील नागरिक आपली गुंतवणूक थांबवतील." दरम्‍यान, युक्रेनचे राष्‍ट्राध्‍यक्ष क्‍लोडिमिर जेलेंस्‍की यांच्‍याशी बायडेन यांनी चर्चा केली. युक्रेनचे सार्वभौम कायम राहण्‍यासाठी अमेरिका वचनबद्‍ध आहे". दरम्‍यान, रशियाने घेतलेल्‍या आक्रमक भूमिकेचा निषेध करत अमेरिका आणि ब्रिटनने रशियावर कारवाई केली जाईल, असे म्‍हटलं आहे.

२०१४मध्‍येही रशियाने दोन प्रांतांना दिला होता स्‍वतंत्र राष्‍ट्राचा दर्जा

रशियाने एप्रिल २०१४ मध्‍येही  युक्रेनमधील लुहांस्‍क आणि डोनेस्‍टक या प्रांतांना दिला होता. २०१४ पासून युक्रेन लष्‍कर आणि रशियातील फुटीरवादी संघटना यांच्‍यामधील संघर्षात आतापर्यंत १० हजाराहून अधिक नागरिकांचा मृत्‍यू झाला आहे. आता मागील काही महिन्‍यांपासून पुन्‍हा या देशांमधील संघर्ष चिघळला आहे. अमेरिकेसह ब्रिटन आणि कॅनडानेही युक्रेनला लष्‍करी मदत सुरु केली आहे. युक्रेनच्‍या पूर्वेला रशिया आहे तर पश्‍चिमेला युरोप. १९९१ मध्‍ये रशियाचे १५ देशांमध्‍ये विघटन झाले. त्‍यानंतर २०१३ पासून युक्रेन आणि रशियामधील संघर्ष तीव्र झाला. आता नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन ( नाटो ) सदस्‍य अमेरिकासह ३० देशांनी युक्रेनमधील हस्‍तक्षेप थांबवावा, अशी मागणी रशियाकडून होत आहे. रशियाने युक्रेनवर हल्‍ला केला तर नाटो सदस्‍य देश युक्रेनच्‍या मदतीला धावतील. त्‍यामुळे या दोन देशांमध्‍ये युद्‍धाचा भडका उडालाच तर याचा फटका संपूर्ण जगाला बसणार आहे.

हेही वाचलं का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news