Russia Ukraine crisis : युक्रेन सीमेवर रशियाकडून आणखी ७ हजार सैन्य तुकड्या तैनात, अमेरिकेचा दावा | पुढारी

Russia Ukraine crisis : युक्रेन सीमेवर रशियाकडून आणखी ७ हजार सैन्य तुकड्या तैनात, अमेरिकेचा दावा

पुढारी ऑनलाईन डेस्क

Russia Ukraine crisis : रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष अद्याप निवळलेला नाही. रशियाने युक्रेनच्या सीमेवरून सैन्य माघारी घेत असल्याची घोषणा केली होती. यामुळे रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध टळले असल्याचे बोलले जात असताना नवीन एक माहिती समोर आली आहे. रशियाने युक्रेनच्या सीमेवर हजारो सैनिकांच्या तुकड्या तैनात केल्या असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे.

रशियाने युक्रेनच्या सीमेवरुन सैन्य माघारी घेतल्याचे वृत्त अमेरिकेने फेटाळून लावले आहे. उलट रशियाने युक्रेनच्या सीमेजवळ आणखी ७ हजारांहून अधिक सैनिकांच्या तुकड्या तैनात केल्या आहेत, असा दावा अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने केला आहे. रशियाने युक्रेनच्या सीमेवरील सैन्य तैनाती कमी केल्याचा दावा अमेरिकेने फेटाळून लावला आहे. ‘रशियाचा सैन्य माघारीचा दावा खोटा आहे,’ असे अमेरिकेच्या अधिकाऱ्याने एनबीसी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे.

रशियाने युक्रेनच्या सीमेवर दीड लाखांहून अधिक सैन्य तैनात केले आहेत. यामुळे युद्धाचे संकट निर्माण झाले होते. दरम्यान, युद्ध सराव संपल्यानंतर सैन्य आपल्या ठिकाणी माघारी परततील असे रशियाने सांगितले आहे. याबाबत रशियाने एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. त्यात त्यांनी सैन्यांच्या तुकड्या माघारी बोलावण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे म्हटले आहे. पण यावरुन अमेरिकेने पुन्हा एकदा रशियावर गंभीर आरोप केला आहे.

युक्रेनवर जर हल्ला केलास रशियाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा अमेरिकेने याआधी दिला आहे. रशियाने एक लाख सैनिकांनी युक्रेनवर हल्‍ला केला तर दुसर्‍या महायुद्‍धानंतर एका देशावर झालेला हा सर्वात मोठा हल्‍ला ठरेल. या दोन्‍ही देशांमध्‍ये युद्‍ध झाल्‍यास संपूर्ण जगच बदलून जाईल, असे अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष ज्‍यो बायडेन यांनी म्हटले होते.

रशिया-युक्रेन (Russia Ukraine crisis) तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने युक्रेनमधील सुमारे २० हजार भारतीयांना मायदेशी परतण्याचे आवाहन केले आहे. तसेत युद्धाच्या शक्यतेने अनेकांनी युक्रेन सोडून जाण्यास सुरुवात केली आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : संजय राऊत यांचा ED, CBI चौकशीवरून भाजपवर हल्लाबोल | भाजप नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप

Back to top button