russia-ukraine conflict : युक्रेनवर रशिया टाकणार ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ | पुढारी

russia-ukraine conflict : युक्रेनवर रशिया टाकणार ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’

लंडन ; वृत्तसंस्था : रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन हे (russia-ukraine conflict) युक्रेनसोबतच्या युद्धाची सुरुवात अणुबॉम्बनंतर सर्वाधिक घातक असलेल्या‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’च्या हल्ल्याने करू शकतील, असा दावा ब्रिटिश संरक्षण दलातील सूत्रांनी केला आहे. रशियाने या बॉम्बचा वापर यापूर्वीही सीरियावर केलेला आहे, असे सांगितले जाते.

रशिया आणि युक्रेनदरम्यान (russia-ukraine conflict) युद्धसद‍ृश स्थिती आहे. रशियाच्या जवळपास 2 लाख सैनिकांनी युक्रेनला घेराव घातलेला आहे. रशिया युद्धाच्या तयारीत असल्याचे ताज्या उपग्रहीय छायाचित्रांतूनही स्पष्ट झाले आहे. यादरम्यान रशिया आक्रमणाची सुरुवातच ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ने करणार असल्याच्या ब्रिटिश दाव्याने जगभराचे कान टवकारले आहेत. रशियाचा हा बॉम्ब अणुबॉम्बनंतर जगातील सर्वात घातक मानला जातो. त्याचा स्फोट 44 टन ‘टीएनटी’च्या (स्फोटाच्या तीव्रतेचे परिमाण) जवळपास होतो.

‘मिरर’ या ब्रिटिश वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले असून, युक्रेनवर जरब बसविण्यासाठी पुतीन यांनी लष्कराला हा बॉम्ब वापरण्याची परवानगी दिलेली आहे, असे या वृत्तात म्हटले आहे. हा बॉम्ब लढाऊ विमानातून फेकला जातो. हवेतच त्याचा स्फोट होतो. कमी क्षमतेच्या अणुबॉम्ब एवढाच हाहाकार हा बॉम्बही उडवतो. हवा आणि इंधनामुळे त्याची परिणामकारकता

अधिकच भयावह होते. बॉम्बस्फोटानंतर सुपरसोनिक लाटा उसळतात. आपल्या लक्ष्याला वाफेत बदलून टाकेल इतकी उष्णता हा स्फोट निर्माण करतो. ‘रेडिएशन’चा धोका मात्र यातून उद्भवत नाही. हा बॉम्ब जगात सध्या फक्‍त रशियाकडे आहे, हे विशेष!

‘फादर बॉम्ब’ 2007 चा (russia-ukraine conflict)

‘फादर बॉम्ब’नेच हल्ल्याची सुरुवात झाल्यास त्याचा मानसिक दबाव युक्रेनवर येईल आणि प्रतिकारापूर्वीच युक्रेन हतबल होऊन बसेल. मोठ्या संख्येने लोक मारले जातील.

अमेरिकन ‘मदर’हून चार पट

अमेरिकेच्या ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब’पेक्षा रशियाचा हा ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चार पटीने घातक आहे. रशियाने 2007 मध्ये तो विकसित केला होता. ‘मदर बॉम्ब’ स्फोटानंतर 11 टन ऊर्जा निर्माण करतो, तर ‘फादर बॉम्ब’ 44 टन! अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये ‘मदर बॉम्ब’चा वापर केला होता, तेव्हा जमिनीत 1 हजार फूट खोल खड्डा पडला होता. जवळपासचा संपूर्ण परिसर उद्ध्वस्त झाला होता. रशियाचा ‘फादर बॉम्ब’ अमेरिकेच्या ‘मदर बॉम्ब’पेक्षा चौपट घातक आहे म्हटल्यावर युक्रेनमध्ये काय घडेल, त्याची कल्पनाही काटा उभा करते.

Back to top button