देशातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट, २४ तासांत १३ हजार नवे रुग्ण, २३५ मृत्यू | पुढारी

देशातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट, २४ तासांत १३ हजार नवे रुग्ण, २३५ मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क

देशात दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट नोंदवण्यात येत आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे १३ हजार ४०५ नवे रुग्ण (new Covid cases) आढळून आले आहेत. तर २३५ जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्या २० हजारांच्या खाली आली आहे. तसेच याआधीच्या दिवशीच्या तुलनेत रुग्णसंख्येत १६ टक्क्यांनी घट झाली आहे.

सध्या देशात १ लाख ८१ हजार ७५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. दिवसभरात ३४ हजार २२६ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. यामुळे देशात आतापर्यंत ४ कोटी २१ लाख ५८ हजार ५१० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत ५ लाख १२ हजार ३४४ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. सध्याचा पॉझिटिव्हिटी रेट १.२४ टक्क्यांवर आला आहे. देशात कोरोना प्रतिबंधक लसीचे १७५ कोटी ८३ लाख २७ हजार ४४१ डोस देण्यात आले आहेत.

याआधीच्या दिवशी १६ हजार ५१ कोरोनाबाधितांची (new Covid cases)  भर पडली होती. तर, २०६ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. दरम्यान, ३७ हजार ९०१ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती. सोमवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.३३ टक्के नोंदवण्यात आला होता. तर, दैनंदिन कोरोनासंसर्गदर १.९३ टक्के आणि आठवड्याचा कोरोनासंसर्गदर २.१२ टक्के नोंदवण्यात आला होता.

ओमायक्रॉन सब व्हेरियंट ‘बीए.२’ संबंधी मोठा दावा

देशात कोरोनामुक्तांचा वेग वाढला आहे. दरम्यान, कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने बनवण्यात आलेल्या टास्क फोर्सचे सह-अध्यक्ष राजीव जयदेवन यांनी ओमायक्रॉन सब व्हेरियंट ‘बीए.२’ संबंधी मोठा दावा केला आहे. बीए.२ हो कोरोनाचा नवीन व्हेरियंट नाही, तर ओमायक्रॉनचाच सब व्हेरियंट आहे. ओमायक्रॉनचा हा सब व्हेरियंट बीए.१ च्या तुलनेत अधिक संसर्गजन्य आहे. पंरतु, हा सब व्हेरियंट कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढीसाठी कारणीभूत ठरणार नाही. बीए.१ ने संसर्गग्रस्त झालेल्या रूग्णांना बीए.२ ची लागण होणार नाही, असे देखील जयदेवन यांनी स्पष्ट केल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, कोरोना संसर्गाची तिसरी लाट जरी ओसरली असली तरी लसीकरण वेगाने सुरू आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारी म्हणून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स तसेच ६० वर्षांहून अधिक वय असलेल्यांना बूस्टर डोस देण्यात येत आहेत. आतापर्यंत ४० लाख ४९ हजार ५०२ आरोग्य कर्मचाऱ्यांसह ५९ लाख ११ हजार २५२ फ्रंटलाईन वर्कर्स आणि ९० लाख २४ हजार ४९५ वयोवृद्धांना बूस्टर डोस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

मुंबईत कोरोनाबाधित प्रथमच शंभरच्या खाली

मुंबई शहर कोरोनाच्या मगरमिठीतून मुक्त होत आहे. सोमवारी २१ फेब्रुवारीला कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट झाली. गेल्या काही महिन्यांतील ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. २४ तासांत अवघ्या ९६ रुग्णांची नोंद झाली, तर १ जणाचा मृत्यू झाला. दिवसभरात १८८ रुग्ण बरे झाले. सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार ४१५ इतकी खाली आली आहे. कोरोना चाचण्यांमध्येही मोठी कपात झाली असून गेल्या २४ तासांत अवघ्या १६ हजार ४७६ चाचण्या करण्यात आल्या.

Back to top button