U.S. President Biden : रशिया – युक्रेन युद्‍ध झालं तर संपूर्ण जगच बदलून जाईल : अमेरिका राष्‍ट्राध्‍यक्ष ज्‍यो बायडेन यांचा इशारा | पुढारी

U.S. President Biden : रशिया - युक्रेन युद्‍ध झालं तर संपूर्ण जगच बदलून जाईल : अमेरिका राष्‍ट्राध्‍यक्ष ज्‍यो बायडेन यांचा इशारा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : रशिया-युक्रेन वाढलेल्‍या तणावावर अमेरिकेने पुन्‍हा एकदा चिंता व्‍यक्‍त केली आहे. युक्रेनच्‍या सीमेवर रशियाने मोठ्या प्रमाणावर सैनिक तैनात केले आहेत. रशियाने एक लाख सैनिकांनी युक्रेनवर हल्‍ला केला तर दुसर्‍या महायुद्‍धानंतर एका देशावर झालेला सर्वात मोठा हल्‍ला ठरेल. या दोन्‍ही देशांमध्‍ये युद्‍ध झाल्‍यास संपूर्ण जगच बदलून जाईल, असा इशारा अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष ज्‍यो बायडेन (U.S. President Biden ) यांनी व्‍यक्‍त केली आहे. दरम्‍यान, युक्रेनला मदत करण्‍याबराेबरच युद्‍धाची शक्‍यता व्‍यक्‍त करत युरोपमधील देशांनी इंधन संकटावर उपाययोजना सुरु केल्‍या आहेत.

U.S. President Biden : रशियाने युक्रेनच्‍या सुरक्षेची हमी द्‍यावी

युक्रेनवर हल्‍ला करणार नाही, असा दावा रशियाने केला आहे. युक्रेनबरोबरील संघर्ष हा नाटो आणि अमेरिकेने चेतावणी दिल्‍यामुळेच सुरु आहे. ‘नाटो’ युक्रेनच्‍या सुरक्षेची हमी मागत आहे. मात्र नाटोने युक्रेनमध्‍ये हस्‍तक्षेप करु नये, याची हमी आम्‍हाला हवी आहे, असेही रशियाने स्‍पष्‍ट केले आहे.

अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष ज्‍यो बायडन यांनी रशियाला मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा यापूर्वीच दिला आहे. यानंतर मंगळवारी याचा पुन्‍नरुच्‍चार करत ते म्‍हणाले की, रशियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष पुतिन यांच्‍यावरच प्रतिबंध लावण्‍याचा विचार केला जावू शकतो.

रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष मागील काही महिन्‍यांपासून कमालीचा वाढला आहे. अमेरिकेसह ब्रिटन आणि कॅनडानेही युक्रेनला लष्‍करी मदत सुरु केली आहे. युक्रेनच्‍या पूर्वेला रशिया आहे तर पश्‍चिमेला युरोप. १९९१ मध्‍ये रशियाचे १५ देशांमध्‍ये विघटन झाले. त्‍यानंतर २०१३ पासून युक्रेन आणि रशियामधील संघर्ष तीव्र झाला. आता नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन ( नाटो ) सदस्‍य अमेरिकासह ३० देश युक्रेनला मदत करत आहेत. त्‍यांनी युक्रेनमधील हस्‍तक्षेप थांबवावा, अशी मागणी रशियाकडून होत आहे. रशियाने युक्रेनवर हल्‍ला केला तर नाटो सदस्‍य देश युक्रेनच्‍या मदतीला धावतील. त्‍यामुळे या दोन देशांमध्‍ये युद्‍धाचा भडका उडालाच तर याचा फटका संपूर्ण जगाला बसणार आहे.

हेही वाचलं का? 

 

 

Back to top button