

इस्लामाबाद; पुढारी ऑनलाईन : सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये ( Russia-Ukraine Crisis ) मोठा तणाव सुरु आहे. या दोन्ही पारंपरिक विरोधकांच्यामुळे अमेरिका आणि रशियासुद्धा पुन्हा आमने सामने उभे ठाकले आहे. सध्या युक्रेन आणि रशिया यांच्यातील तणाव थांबविण्याचे तसे शांती प्रस्तापित करण्याचे प्रयत्न जवळ जवळ संपुष्टात आल्याची स्थिती आहे. दोघांनी देखिल युद्धाची तयारी केली आहे. या दोन देशांच्या भांडणात भारताचा शेजारी असणारा पाकिस्तान मात्र मोठ्या अडचणीत सापडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानातील माध्यमात येणाऱ्या बातम्यांनुसार हे युद्ध जर पेटले तर मात्र पाकिस्तानची अर्थव्यवस्था मोठ्या संकटात सापडणार आहे. याचा परिणाम सर्वसामन्यांच्या जनजीवनावर पडू शकतो.
या सर्वप्रकरणात रशियाचे म्हणणे आहे की, तो पहिल्यांदा युक्रेनवर ( Russia-Ukraine Crisis ) हल्ला करणार नाही. पण, युक्रेनच्या सीमेवर रशियाने एक लाखाहून अधिक सैनिक तैनात केले आहेत. या सगळ्या तणावात अमेरिकेने आपले २०० सैनिक युक्रेनच्या पोलंडच्या शेजारील लवीव या शहरामध्ये पोहचले आहेत. हे सैनिक युक्रेनच्या सेनेला मार्गदर्शन करणार आहेत. तसेच रॉकेट लॉन्चर चालवणे आणि वेगवेगळे ट्रेनिंग देखिल देणार आहेत. पण, पुर्व युरोपमध्ये उठलेले हे वादळ पाकिस्थानच्या मुळावर येण्याचा धोका निर्माण झाला आहे.
अमेरिका की रशिया कोणाची निवड करणार पाकिस्तान ? ( Russia-Ukraine Crisis )
पाकिस्तानची राजकीय आणि आर्थिक कोंडी निर्माण करणारी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. जग सध्या वेगाने दोन मोठ्या सत्तांच्या ध्रुवीकरणात विभागली जात आहे. अशा वेळी पाकिस्तानला तटस्थ रहाणं अवघड होणार आहे. पाकिस्तान एकीकडे रशियाशी आपली मैत्री वाढवत आहे. त्यामुळे या प्रकरणात तो काही बोलणं टाळत आहे. तसेच तो अमेरिकेची पण मदत घेतो आहे. म्हणून त्याला कोणातरी एकाची बाजू घ्यावीच लागेल.
पाकिस्तानात महागाई वाढण्याची चिन्हे ( Russia-Ukraine Crisis )
पाकिस्तानमध्ये महागाई वाढत आहे. युद्धाच्या पार्श्वभूमिवर ती आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. आधीच पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या डबघाईला आला आहे. त्यात हे नवे संकट त्याच्या समोर उभारणार आहे. १०० डॉलर प्रति बॅरेल तेलांच्या किंमतीसाठी पाकिस्तानला तयार रहावे लागणार आहे. तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे देशातील विकासाची गती मंदावण्याची भीती आता पाकिस्तान सरकारला वाटू लागली आहे. शिवाय रशिया आणि अमेरिका दोन्ही देशांमध्ये पाकिस्तान आयात निर्यात करतो. या युद्धाचा परिणाम थेट आयात निर्यातीवर होणार आहे. जर आयात मध्ये घट झाली आणि निर्यात देखिल ठप्प झालं तर याचा थेट परिणाम पाकिस्तानच्या चलनावर पडून आंतराष्ट्रीय बाजारात पाकिस्तानी चलनाची किंमत देखिल पडू शकते.
पाकिस्तानच्या खरेदी क्षमतेवर होणार परिणाम
आंतरराष्ट्रीय बाजारात पाकिस्तानी चलनाची किंमत पडली तर यातून पाकिस्तानला लवकर उभारी घेणे अशक्य आहे. काहि दिवस अथवा महिन्यांकरिता तेलाच्या किंमतीं १० ते २० डॉलरने वाढल्या तर पाकिस्तानाचे १ ते २ बिलियन डॉलर्सचे नुकसान होऊ शकते. याचा थेट परिणाम पाकिस्तानच्या खरेदी क्षमतेवर पडणार आहे.