

विजय गायकवाड; वैजापूर पुढारी वृत्तसेवा : औरंगाबाद ऑनर किलिंग : गेल्या काही वर्षांपूर्वी सैराट चित्रपट येऊन गेला. या चित्रपटातील कथानकाप्रमाणेच मनाचा थरकाप उडविणारी घटना तालुक्यातील लाडगाव शिवारातील शेतवस्तीवर वस्तीवर घडली. या चित्रपटातील नायक – नायिकेच्या प्रेमविवाहातून वादंग निर्माण होते. या दोघांनाही जातीचे बंधन अडसर ठरते. परंतु लाडगावातील घटनेला जातीची किनार नव्हती. दोघेही एकाच जातीचे असतानाही भावाने सख्ख्या बहिणीची हत्या केली. सर्व काही गुण्यागोविंदाने सुरू असताना ही अघटित घटना घडली. दोघांचेही प्रेम महाविद्यालयीन जीवनापासून फुलत होते. त्याचा शेवट प्रेमविवाहात झाला खरा. परंतु भावाने बहिणीचा निर्दयपणे शेवट करून पडदा टाकला.
तालुक्यातील लाडगाव शिवारातील अविनाश थोरे व किर्ती मोटे या दोघांचे महाविद्यालयात असताना प्रेम फुलू लागले. दोघेही तालुक्यातील गोयगाव येथील मुळ रहिवासी. परंतु अविनाश थोरे याची शेती लाडगाव शिवारात होती. दोघांचीही घरे अगदी हाकेच्या अंतरावर अन् दोघेही वैजापूर येथील एकाच महाविद्यालयात शिकण्यासाठी जात होते. जाण्यासाठी रस्ताही एकच होता. एकाच गावातील अन् रहायला जवळ – जवळ असल्यामुळे दोघांची ओळख होतीच. ओळखीचे प्रेमात रुपांतर झाले.
शेवटी दोघांनी प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. परंतु घरातून विरोध होईल. असे गृहीत धरून दोघांनी घर सोडले अन् जून 2021 मध्ये प्रेमविवाह केला. पूर्वाश्रमीची किर्ती मोटे नंतर किर्ती थोरे झाली. लग्नाच्या चार दिवसानंतर दोघेही घरी आले. घरातील सदस्यांचा विरोध कमी होईल. असे गृहीत धरून ते दोघे घरी आले खरे. परंतु किर्तीच्या घरातील सदस्यांना खदखद कायम होती. अविनाश तसा सामान्य कुटुंबातील तर किर्ती चांगल्या घरात लाडात वाढलेली एकुलती एक मुलगी होती. तिचे लग्न एखाद्या गडगंज कुटुंबातील मुलाशी व्हावे. अशी तिच्या घरातील सदस्यांची इच्छा होती. ही घटना घडण्यापूर्वी चार दिवस अगोदर मृत किर्तीची आई व भाऊ तिच्या लाडगाव शिवारातील शेतवस्तीवर येऊन गेले होते. ते कशासाठी आले व त्यांच्यात काय चर्चा झाली. हे त्यांनाच ठाऊक. परंतु 5 डिसेंबर रोजी झालेल्या किर्तीच्या निर्घृण खूनामुळे यक्षप्रश्न निर्माण झाले आहेत. त्याच दिवशी त्यांना किर्तीचा काटा काढायचा होता. असा संशय व्यक्त करण्यास वाव आहे.
कारण रविवारी किर्तीची आई शोभा संजय मोटे व भाऊ संकेत मोटे खून करण्याच्या उद्देशानेनच आले होते. असे म्हणायला मोठी पुष्टी मिळते. तिच्या भावाने जर्कीनमध्ये कोयता शिताफीने लपवून आणला होता. क्रौर्याची सीमा गाठीत कोयत्याने तिचे मुंडकेच धडावेगळे केले. एवढे कमी झाले म्हणून की काय पराक्रम गाजविल्याच्या अविर्भावात तो तिचे धडावेगळे केलेले मुंडके हातात घेऊन सासरच्या मंडळींना दाखवित सुटला. हा सर्व घटनाक्रम सुरू असताना किर्तीच्या घरातील अन्य सदस्य बाजूला शेतातच होते. कदाचित ते घरात थांबून असते तर किर्तीचा जीव वाचला असता अन् तिच्या भावाचीही इथपर्यंत मजल गेली नसती.
या घटनेला केवळ किर्तीचा भाऊच एकटा जबाबदार नाही तर तिचीही आईही तितकीच जबाबदार आहे. मुलाच्या कृत्याला आईचे पाठबळ होते. त्यामुळे भावाने ही 'मर्दुमकी' गाजविली. मारेकरी भाऊ केवळ 18 वर्षांचा आहे. परंतु त्याची बहिणीचा खून करण्यापर्यंत गेली. यावरून समाजातील युवकांची मानसिकता व त्यांच्यातील क्रौर्य कोणत्या थराला पोहोचले. याबाबत मंथन करण्याची गरज समाजावर येऊन ठेपली आहे. म्हणायला मोबाईल युग असले तरी मानसिकता मात्र बुरसटलेलीच आहे. हेच या घटनेवरून सिध्द होते.
सैराट चित्रपटातील नायिका आर्ची बिनधास्त बुलेटवर फिरतांना दाखविली. या चित्रपटातील आर्ची आणि किर्ती या दोहोंच्यात एक साधर्म्य होते. किर्ती लाडाची असल्यामुळे घरातील सदस्यांनी तिला बुलेट घेऊन दिली होती. त्यामुळे ती महाविद्यालयात बुलेटवरच जात होती. घरातील सदस्यांनी तिचे पुरेपूर लाड केले. परंतु तिची हत्याही घरातील सदस्यानेच केली.
अविनाश व किर्तीच्या कौटुंबिक व अर्थिक परिस्थितीत फरक होता. तिचे लग्न अर्थिकदृष्ट्या मोठ्या कुटुंबातील मुलाबरोबर धुमधडाक्यात व्हावा. हीच तिच्या घरातील सदस्यांची इच्छा होती. परंतु तिने विरोधात जाऊन अविनाशशी विवाह केल्याने घरातील सदस्यांची तळपायाची आग मस्तकात गेली अन् खोटी प्रतिष्ठा व बडेजावपणाने किर्तीचा बळी घेतला.