चंद्रपूर : तेरवीला जाताना काळाचा घाला, भीषण अपघातात आई, वडील, मुलगी ठार | पुढारी

चंद्रपूर : तेरवीला जाताना काळाचा घाला, भीषण अपघातात आई, वडील, मुलगी ठार

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा

नातेवाईकांकडे तेरवीच्या कार्यक्रमाकरिता वाहनाने जात असताना भीषण अपघात होवून एकाच कुटुंबातील आई वडील व मुलीचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली. हा अपघात चिमूर तालुक्यातील पिंपळनेरी खापरी मार्गावर उमरी फाट्या जवळ काल रविवारी (5 डिसेंबर) सायंकाळच्या सुमारास घडला. या भीषण अपघातात तीन जण ठार तर दोघे जखमी झाले आहे.

चिमूर तालुक्यातील चिमूर-भिसी-उमरेड मार्गावरील खापरी (धर्मू) येथील मेश्राम व चुनारकर कुटुंब हे एम एच 34 बिवी 3284 या वाहनाने चिमूर तालुक्यातील सरडपार येथील तेरवी कार्यक्रमासाठी निघाले होते. पिंपळनेरी व खापरी मार्गावर उमरी फाट्या जवळ वळणमार्ग चुकल्याने वाहनाला भीषण अपघात झाला. यात सायत्रा मोतीराम मेश्राम (वय ६५, रा. धर्मु खापरी), मोतीराम भिकारी मेश्राम (वय ७०) व कमल चुनारकर (वय ५०, ऊर्जानगर चंद्रपूर) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर ताजूल मेश्राम(२९, खापरी), चालक अक्षय चुनारकर (चंद्रपूर), स्नेहा मेश्राम(१२, खापरी), अंकित मेश्राम (१०, खापरी) हे चार जण जखमी झाले.

वळणाचा अंदाज चुकल्याने हा अपघात घडला असून अपघात ऐवढा भीषण होता ही संपूर्ण वाहनाचा चेंदामेंदा झाला आहे. या दुःखद घटनेने खापर गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. जखमींना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : जेव्हा शाहू महाराजांनी बाबासाहेबांना 750 रुपये दिले | Shahu Maharaj and dr.Babasaheb Ambedkar

Back to top button