पुढारी ऑनलाईन डेस्क : R Ashwin Record : न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात अश्विनला चौथी विकेट मिळताच त्याने एक खास विक्रम आपल्या नावावर केला. त्याने मायदेशातील कसोटी क्रिकेटच्या कारकिर्दीत ३०० बळी पूर्ण केले आहेत. भारताकडून कसोटीत ३०० बळी घेणारा तो दुसरा गोलंदाज ठरला आहे. अश्विनपूर्वी असा पराक्रम भारताचा माजी दिग्गज अनिल कुंबळेनेच केला होता. कुंबळेने आपल्या कारकिर्दीत मायदेशात ६३ कसोटी सामने खेळले आणि ३५० विकेट्स आपल्या नावावर केल्या. त्याचबरोबर अश्विनने आतापर्यंत भारतात ४९ कसोटी सामने खेळले असून ३०० बळींचा टप्पा पूर्ण केला आहे. हरभजन सिंगने मायदेशात २६५ तर, माजी कर्णधार कपिल देव यांनी २१९ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय अश्विनचा संघातील सहकारी रवींद्र जडेजाने आतापर्यंत १६२ विकेट्स मिळवल्या आहेत.
अश्विनने आता पर्यंत ४२६ विकेट्स (मुंबई कसोटी संपली तेव्हापर्यंत) घेतल्या आहेत. भारताकडून कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा तो तिसरा गोलंदाज ठरला आहे. माजी कर्णधार कपिल देव (४३४) हे दुस-या आणि अनिल कुंबळे (६१९) पहिल्या क्रमांकावर आहेत. कपिल देव यांना मागे टाकण्यासाठी अश्विनला अजून नऊ विकेट्सची गरज आहे. अगामी द. आफ्रिका दौ-यावर तो नक्कीच कपिल देव यांना मागे टाकेल आणि इतिहास रचेल अशी अशा क्रिकेट चाहत्यांना आहे.
मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका)
जेम्स अँडरसन (इंग्लंड)
अनिल कुंबळे (भारत)
स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड)
शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया)
रविचंद्रन अश्विन (भारत)*
आर अश्विन २०२१ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याने यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये ५० बळी पूर्ण केले आहेत. यासोबतच अश्विन एका कॅलेंडर वर्षात ५० किंवा त्याहून अधिक बळी घेणारा गोलंदाज बनला आहे. अश्विनने एका कॅलेंडर वर्षात ४ वेळा ५० किंवा त्याहून अधिक विकेट घेतल्या आहेत.
मुंबईतील वानखेडे मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात ३२५ धावा केल्या होत्या. न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेल याने टीम इंडियाच्या सर्वच्या सर्व १० फलंदाजांना बाद करून इतिहास रचला. पाहुण्या संघाचा हा आनंद क्षणीक ठरला. त्यांचा पहिला डाव डाव ६२ धावांवर आटोपला. पहिल्या डावाच्या जोरावर भारताने २६३ धावांची आघाडी घेतली होती. यानंतर भारताने आपला दुसरा डाव ७ गडी गमावून २७६ धावांवर घोषित केला. भारताने किवी संघाला ५४० धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना किवी संघाची दमछाक झाली आणि सामन्याच्या चौथ्या दिवशी पहिल्याच सत्रात त्यांचा सगळा संघ १६७ धावांत पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याचबरोबर भारताने हा सामना तब्बल ३७२ धावांनी जिंकत कसोटी क्रिकेटच्या इतिहासातीक धावांच्या बाबतीत सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली.