सांगली जिल्हा बँकेचा परवाना रद्दची भीती : खा. संजय पाटील | पुढारी

सांगली जिल्हा बँकेचा परवाना रद्दची भीती : खा. संजय पाटील

सांगली; पुढारी वृत्तसेवा : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचा कारभार असाच सुरू राहिला तर सीआरएआर (कॅपिटल टू रिस्क असेटस् रेशो) (भांडवल पर्याप्तता प्रमाण) कमी होईल. यामुळे कोणत्याही क्षणी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेकडून रद्द होऊ शकतो, असा गौप्यस्फोट खासदार संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. मालमत्ता विकून जिल्हा बँक व शेतकर्‍यांची देणी देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पाटील म्हणाले, जिल्ह्यात काही जण मॅच फिक्सिंगप्रमाणे राजकारण करीत आहेत; पण मी सरळ रेषेत राजकारण करतो. काही जणांनी जिल्हा बँकेची कर्जे बुडविण्यासाठीच घेतली आहेत काय, असा संशय येतो. बँकेचे कर्ज फेडायचे नाही, शेतकरी कामगारांचेही शोषण करायचे, असा प्रकार काहींकडून सुरू आहे. स्वत:च्या संस्थांसाठी बँक बुडवायची हे धोरण चुकीचे आहे. यामुळे जिल्हा बँक अडचणीत आली आहे.

बँकेचा सीआरएआर अत्यंत कमी झाला आहे. आणखी 50 कोटी रुपये इकडे-तिकडे झाले तर सीआरएआर आरबीआयच्या नियमाच्या खाली येऊ शकतो. यामुळे रिझर्व्ह बँक कोणत्याही क्षणी जिल्हा बँकेचा परवाना रद्द करू शकते. त्यामुळे नवीन संचालक मंडळाने ही सावधानता बागळून कारभार करावा. जे बुडवे आहेत, त्यांच्याकडून वसुली करावी, तरच बँक वाचणार आहे.

ते पुढे म्हणाले, बँक व शेतकर्‍यांच्या देण्याबाबत मी काही प्रमाणात दोषी आहे. त्यामुळे मला यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. परंतु इतरांपेक्षा माझे कर्ज व शेतकर्‍यांची देणी कमी आहेत. माझ्या तासगाव व यशवंत साखर कारखान्याचे व इतर काही संस्थांनी बँकेकडून कर्ज घेतले आहे. ही सर्व रक्कम 14 ते 15 कोटी रुपयांच्या आसपास असेल. यासाठी माझी 25 कोटी रुपयांचा मालमत्ता तारण आहे. परंतु माझे कर्ज काही 160 कोटी थकीत नाही. मी वेगवेगळी कारणे काढून कर्ज भरण्यास टाळाटाळ करीत नाही. वेळ पडली तर मी मालमत्ता विकून बँकेचे कर्ज पेडण्यास तयार आहे. तसेच ऊस उत्पादकांची काही देणी आहेत. ही देणी मी आठ दिवसांत देणार आहे. यानंतर मात्र जिल्ह्यात सुरु असलेल्या फिक्सिंगच्या राजकारणाचा सोक्षमोक्ष लावणार आहे.

Back to top button