ममतांचा उतावीळपणा | पुढारी

ममतांचा उतावीळपणा

देशपातळीवरील राजकारणाचे नेतृत्व करण्यासाठी व्यापक दृष्टिकोन लागतो, हीच बाब पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी विसरलेल्या दिसतात. बेरजेचे राजकारण केल्याशिवाय प्रस्थापित राजकारण्यांना आव्हान देता येत नाही, ही बाबही त्यांच्या लक्षात आलेली दिसत नाही. तसे असते तर त्यांनी मुंबईत येऊन राजकीय उतावीळपणाचे जाहीर प्रदर्शन घडवत तशी वक्तव्ये केलीच नसती. भाजपशी दोन हात करताना काँग्रेसला दूर ठेवण्याच्या त्यांच्या संकेतात कोणताही शहाणपणा दिसत नाही.

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस शिल्लक राहिलेली नाही. तशी ती देशातही नसेल, असा समज ममतांनी करून घेतलेला दिसतोय. पश्चिम बंगालमध्ये डाव्यांच्या चळवळीविरुद्ध ममतांनी मोट बांधली. आपण भूमिपुत्रांचे तारणहार आहोत हे ठासवण्यात त्या यशस्वी ठरल्या. त्यामुळे आपण देशपातळीवरचे नेतृत्व करण्यात सक्षम झालो आहोत, असे त्यांना वाटत असावे. त्यांच्या मुंबई दौर्‍याची देशभर चर्चा झाली असली तरी त्यातून साध्य मात्र काहीही झालेले नाही. यूपीए आता अस्तित्वात आहेच कुठे? असा प्रश्न विचारून त्यांनी काँग्रेसला बेदखल करण्याचा प्रयत्न केला.

मुंबईत आल्यानंतर काँग्रेस वगळता शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांनी आपण काँग्रेसला किंमत देत नसल्याचे दाखवून दिले. ममतांच्या वक्तव्याने काँग्रेसमध्ये चलबिचल होऊ शकते, हे लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसला सोबत घेऊनच आघाडी करावी लागेल, असे स्पष्ट केल्यानंतर शिवसेनेनेही नंतर काँग्रेसला वगळून भाजप विरोधात लढता येणार नाही, असे सांगितल्याने ममतांच्या मुंबई दौर्‍याची हवा निघून गेली.

ममतांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्यांनी तातडीने प्रतिक्रिया देत विरोधी पक्षांमध्ये फूट पाडणे योग्य नाही, अशा शब्दांमध्ये ममतांचा समाचार घेतला. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांनंतर ममतांच्या शिडामध्ये अंमळ अधिकच हवा भरलेली दिसते. निव्वळ भाजपविरोध हा मुद्दा विरोधी पक्षांना एकत्र येण्यासाठी कारण ठरत असला तरी भाजपला पर्याय देताना आपल्या नेतृत्वाखाली आघाडीचा कार्यक्रम काय? हे ममतांना स्पष्ट करता आलेले नाही.

त्यातही सत्ता हा एकमेव अजेंडा असेल तर सामान्य मतदार त्याला भीक घालत नाही; पण ममतांना त्याचे भान नव्हते आणि त्यांचा भविष्यातील कार्यक्रम दडून राहिलेला नाही. देशपातळीवरचे नेतृत्व करण्याची त्यांना घाई झाल्यामुळे त्यांचा अनेक ठिकाणी तोल जातो. भाजपवर विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गुजरातमधील दंगलीचा आरोप करताना आपण पश्चिम बंगालमध्ये मात्र कोणत्या मार्गाचा अवलंब केला, हे त्या सोयीस्करपणे विसरू पाहत आहेत.

दुसरीकडे ममतांच्या या वक्तव्याचा राज्यातील भाजपने फायदा न घेतला नसता तरच नवल होते. ममतांच्या मुंबईत भेटीगाठी सुरू असतानाच भाजपच्या राज्यातील नेत्यांनी पत्रकार परिषदांचा सपाटाच लावला. त्यात महाविकास आघाडीवर टीका करणे इतकाच उद्देश नव्हता, तर महाराष्ट्रातील उद्योग ममता पश्चिम बंगालला नेण्याचा घाट घालत आहेत, असा आरोप ठरवून करण्यात आला. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कसे निष्क्रिय आहे, ते राज्यात उद्योग आणू शकत नाही आणि राज्यातील उद्योग पश्चिम बंगालमध्ये जात आहेत, अशी आवई भाजपने उठवली.

अर्थात, त्यामागे शिवसेनेला लक्ष्य करण्याचा भाजपचा हेतू लपून राहिला नाही. शिवसेनेवर अशा पद्धतीने आरोप केल्यास त्याचा फायदा मुंबईच्या आगामी महापालिका निवडणुकांमध्ये होईल, असे भाजपला वाटते. अर्थात भाजपचे हे आरोप शिवसेनेने खोडून काढताना महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलेल्या उद्योगांची जंत्रीच सादर केली. त्यामुळे हा मुद्दा हवेत विरून गेला. आता राहिला प्रश्न काँग्रेसचा. भाजपविरोधात आघाडी करताना काँग्रेसला वगळून चालणार नाही, हे शरद पवार यांच्यासह देशातील बहुतांशी विरोधी पक्षांना नीट ठाऊक आहे; पण ममतांचा काँग्रेसशी उभा दावा असल्यामुळे त्यांना या आघाडीमध्ये काँग्रेस नको आहे.

अनेक राज्यांमधून काँग्रेस हद्दपार झाली असली तरी गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या खालोखाल काँग्रेसने मते घेतली होती हे विसरून चालणार नाही. या निवडणुकांमध्ये भाजपकडे 37 टक्के मते, तर काँग्रेसकडे वीस टक्क्यांच्या आसपास मतांचे बळ होते. या तुलनेत तृणमूल काँग्रेसकडे केवळ चार टक्केच मते होती. त्रिपुरा आणि गोव्यासारख्या छोट्या राज्यांमध्ये ममतांनी पक्षविस्तार करण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यासाठी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री लुईजिन फालेरो यांना तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन त्यांना राज्यसभेचे सदस्यत्वही देण्यात आले.

त्रिपुरा आणि आसाममध्ये काँग्रेसच्या काही माजी नेत्यांनी अलीकडे तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे ममतांचा आत्मविश्वास अधिकच दुणावला. त्यांना आता पंतप्रधानपदाची स्वप्ने पडू लागली आहेत; पण भाजप विरुद्ध लढायचे आहे की काँग्रेसशी संघर्ष करायचा आहे, हे त्या ठरवू शकलेल्या नाहीत. विरोधकांमध्ये जितके मतभेद तितका फायदा भाजपला मिळत जाईल. भाजप विरोधातील संघर्षाची धार कमी होईल. केवळ नेतृत्वाची महत्त्वाकांक्षा असून भागत नाही, तर त्यासाठी सर्वसमावेशक नेतृत्वगुणही लागतात.

पश्चिम बंगालच्या पातळीवर ममतांमध्ये हे गुण असले तरी देशपातळीवरील गणित जुळवताना पहिल्याच परीक्षेत त्या फेल झाल्या. आपण भाजप विरोधातील गटांचे नेतृत्व करू शकू, असा आत्मविश्वास ममतांना वाटत असला तरी काँग्रेस त्यांचे नेतृत्व स्वीकारणार नाही. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिघांनाही एकत्र राहणे भाग आहे. भविष्यात ममतांनी काँग्रेसला वगळून आघाडीची हाक जरी दिली तरी या आघाडीचा प्रस्ताव या दोन्ही पक्षांना तसा मान्य नसेल आणि अशी परिस्थिती भाजपच्या पथ्यावर पडणारीच असेल.

Back to top button