मदर मेरी चर्च चर्चबाहेर असणाऱ्या क्रॉसजवळ प्रार्थना करण्याचे आहे विशेष कारण… | पुढारी

मदर मेरी चर्च चर्चबाहेर असणाऱ्या क्रॉसजवळ प्रार्थना करण्याचे आहे विशेष कारण...

पणजी; पुढारी वृत्तसेवा: जगभरात आज (८ डिसेंबर) मदर मेरीचा फेस्त साजरा केला जातो. पणजी येथे सर्व पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या मदर मेरी चर्चमध्येही फेस्त साजरा केला जातोय. यानिमित्ताने येथील एका खास प्रथेची माहिती करून घेऊया…

मदर मेरी हे चर्च सुमारे ४१२ वर्षे जुने आहे. त्यामुळे या वास्तूचा एक वेगळा ऐतिहासिक वारसा आहे. पोर्तुगीज काळामध्ये गोवा राज्याचे सर्व आर्थिक, राजकीय व सामाजिक व्यवहार पणजीमधून चालत असत. त्याकाळात सर्व धर्माची प्रार्थनास्थळे शहरात उभारण्यात आली होती. येथील महालक्ष्मी मंदिर, मस्जिद या काळातील वास्तू आहेत.

मदर मेरी चर्चमधील कोरीव काम हे लाकडामध्ये करण्यात आले असून त्याला देण्यात आलेल्या सोनेरी रंगामुळे ते अधिकच खुलून दिसते. दरवर्षी ८ डिसेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या फेस्ताच्या आधी येथे ९ दिवस प्रार्थना चालतात. याला ‘नोव्हेना’ असे म्हणतात. दहाव्या दिवशी सर्व धार्मिक विधींनी फेस्त साजरा केला जातो. तसेच या निमित्ताने विविध वस्तूंची दुकाने परिसरात लावण्यात येतात. ज्याला फेरी असे संबोधले जाते.

पूर्वीच्या काळी जेव्हा दळणवळणाची साधने फार प्रभावी नव्हती तेव्हा परदेशातील फॅशन काय आहे? हे समण्याचे ठिकाण म्हणजे गोव्यात होणारे हे फेस्त असत. येथील जुने गोव्याचा (old goa) सायबाचा फेस्त हा सर्वात मोठा फेस्त असतो. जो राज्यभर मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यापाठोपाठ डिसेंबरमध्ये विविध शहरांमध्ये हा फेस्त साजरा केला जातो.

पणजी चर्चच्या बाहेर असणारे जे क्रॉस आहे. त्याच्याजवळ केवळ कॅथलिकच नव्हे, तर सर्वधर्माचे लोक मेणबत्ती लावून प्रार्थना करतात. याचे एक विशेष कारण असे आहे की, या क्रॉसजवळ प्रार्थना केल्यास मनातील इच्छा पूर्ण होतात, असा समज येथील लोकांचा आहे. त्यामुळे फेस्ताच्या काळात लोक या ठिकाणी येऊन मेणबत्ती पेटवून आपल्या मनातील इच्छा व्यक्त करतात. प्रभू येशूकडे त्या पूर्ण व्हाव्यात यासाठी साकडे घालतात.

दक्षिणेत जर केरळ, तामिळनाडू या भागात गेलात तर ख्रिश्चन स्त्रिया साडी परिधान केलेल्या पाहायला मिळतील. त्यामुळे कोण कॅथलिक? किंवा कोण हिंदू? हे ओळखणेही कठीण होते. गोव्यात अद्याप विशिष्ट पारंपरिक गोमंतकीय वस्त्रे परिधान करून स्त्रिया फेस्ताच्या प्रार्थनेसाठी येतात. त्यामुळे एक वेगळाच माहोल इथे अनुभवायला मिळतो.

हेही वाचलंत का?

Back to top button