पुढारी ऑनलाईन डेस्क : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीने (RBI Monetary Policy) रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. आज झालेल्या बैठकीत रेपो दर ४ टक्के इतका ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय रिव्हर्स रेपो ३.३५ टक्के तर एमएसपी ४.२५ टक्के इतका कायम ठेवण्याचा निर्णय ही घेण्याता आला.
कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हॅरिएंटची भीती आणि काही देशांनी लावलेले निर्बंध लक्षात घेता हे निर्णय महत्त्वाचे आहेत. कोरोनाच्या या व्हॅरिएंटमुळे देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याचीही भीती व्यक्त होत आहे.
जोपर्यंत देशाची आर्थिक स्थिती पूर्ववत होत नाही तोपर्यंत रिझर्व्ह बँकची (RBI Monetary Policy) भूमिका Accommodative राहील, असे समितीने म्हटले आहे. आर्थिक वर्ष २०२२च्या दुसऱ्या तिमाहीत विकासदर ८.४ टक्के राहिला होता. तर २०२२ या आर्थिक वर्षांत विकासदर ९.५टक्के राहील, असा अंदाज रिझर्व्ह बॅकेने व्यक्त केला आहे. तर तिसऱ्या तिमाहीत विकासदर ६.६ टक्के इतका असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
गर्व्हनर शक्तिकांता दास म्हणाले, ओमायक्रॉनमुळे प्रवास आणि आर्थिक घडामोडींवर निर्बंध येण्याची भीती आहे, त्यामुळे याचा परिणाम पुढील काळातील विकासावर होऊ शकेल. तसेच इंधनावरील व्हॅट कमी झाल्याने त्याचा परिणाम महागाईवर होईल. महागाईचा दबाव पुढील काळात राहणार आहे. या आर्थिक वर्षांच्या चौथ्या तिमाहीपर्यंत महागाई वाढेल आणि ती नंतर कमी होत जाईल, असे ते म्हणाले. ऑक्टोबर महिन्यात कन्झ्युमर प्राईस इंडेक्स ४.४८ टक्के होता.