छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजांनी खऱ्या अर्थाने गोव्याची संस्कृती जोपासली : मुख्यमंत्री प्रमोद सावंत | पुढारी

छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजांनी खऱ्या अर्थाने गोव्याची संस्कृती जोपासली : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

पणजी : पुढारी वृत्तसेवा

पोर्तुगीजांच्या आक्रमणापासून गोव्याच्या संस्कृती रक्षणाचे व जोपासण्याचे काम खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी केले आहे. इतर देशांचा इतिहास गोवा विद्यापीठात शिकवला जातो, पण गोव्याचा इतिहास शिकवला जात नाही, अशी खंत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी व्यक्त केली.

गोवा विद्यापीठाच्या मनोहर पर्रीकर स्कूल ऑफ लॉ, गव्हर्नन्स ॲण्ड पब्लिक पॉलिसी विद्यालयात छत्रपत्री शिवाजी महाराज अध्यासन केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. याप्रसंगी उच्च शिक्षण खात्याचे संचालक प्रसाद लोलयेकर, कुलगुरू हरिलाल मेनन, कुलसचिव व्ही. एस. नाडकर्णी, मनोहर पर्रीकर स्कूलच्या अधिष्ठाता शैला डिसोझा आदी उपस्थित होते.
विधानसभा अधिवेशनात जाहीर केल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र विद्यापीठात होत आहे. याचा आपणास आनंद होत आहे.

छत्रपती शिवाजी महारांचा इतिहास जाणून घेणे आजच्या युगात महत्त्वाचे आहे. त्यांच्याकडे नेतृत्व होते, त्यांनी राबविलेले शासन आणि सार्वजनिक धोरणाची आजच्या काळात गरज आहे. सोळाव्या शतकात त्यांनी राबविलेली राजव्यवस्थेचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. वाचन कमी झाल्याने त्यांचा इतिहास समजून घेतला जात नाही, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी नमूद केले. गोव्यासाठी त्यांनी दिलेले योगदान विसरता येणार नाहीत. पोर्तुगीजांनी गोव्यावर ४५० वर्षे राज्य केले पण गोव्याच्या संस्कृतीचे जतन छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी केले. हा इतिहास विसरता कामा नये.

हेही वाचलं का?

पाहा व्हिडिओ : टाऊन हॉल : कोल्हापुरचं जगप्रसिद्ध वास्तूवैभव

Back to top button