

हवाई वाहतूक क्षेत्रातील कंपनी एअर इंडियाची निविदा अलीकडेच टाटा उद्योगसमुहातील टाटा सन्सने जिंकली होती. येत्या जानेवारी महिन्यापर्यंत प्रत्यक्षात एअर इंडियाची मालकी टाटा सन्सकडे जाण्याची शक्यता असून, तत्पूर्वी एअर इंडियाच्या विद्यमान सर्व संचालकांना राजीनामे द्यावे लागणार असल्याची माहिती मंगळवारी सूत्रांनी येथे दिली.
काही दशकांपूर्वी एअर इंडियाची स्थापना टाटा समुहाने केली होती. मात्र स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तत्कालीन सरकारने त्याचे सरकारीकरण केले होते. प्रचंड तोट्यात गेल्यानंतर एअर इंडियाचे पुन्हा एकदा खाजगीकरण केले जात आहे. एअर इंडियाच्या खरेदीसाठी टाटा समूह 2.4 अब्ज डॉलर्स इतकी रक्कम मोजणार आहे.
सध्या एअर इंडियाच्या संचालक मंडळावर सात सदस्य असून त्यांना लवकरच राजीनामे देण्याचे निर्देश केंद्र सरकारकडून दिले जाणार असल्याचे समजते. सात संचालकांमध्ये चेअरमन, व्यवस्थापकीय संचालक तसेच सरकारनियुक्त दोन संचालकांचा समावेश आहे. विद्यमान संचालक मंडळ गेल्यानंतर टाटा सन्सकडून नवीन संचालक मंडळाची स्थापना केली जाईल.