

पणजी; पुढारी वृत्तसेवा : गोवा आणि कॅसिनो (Goa Casinos) यांचे एक वेगळे नाते आहे. पर्यटकांना आकर्षित करणारे कॅसिनोतील झगमगाट वातावरण आजपासून अनुभवता येणार आहे. कोरोनामुळे बंद असलेल्या कॅसिनोकडे पर्यटकांची पावले आता सायंकाळी वळतील. 50 टक्के क्षमतेने कॅसिनो सुरू राहणार आहेत.
कॅसिनो, स्पा, मसाज पार्लर, नाईट क्लब्स यांनाही राज्य सरकारने 50 टक्के क्षमतेने सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे देशभरातून येणार्या पर्यटकांची पावले आता गोव्याकडे वळतील.
कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्यांना राज्यात परवानगी दिली जात आहे. त्यामुळे काही अंशी लोक गोव्यात पर्यटनासाठी येऊ लागले आहेत. पर्यटन पूर्ण क्षमतेने खुले करायचे झाल्यास केंद्रीय गृहखात्याची परवानगी राज्य सरकारला घ्यावी लागणार आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून कॅसिनो (Goa Casinos) बंद होते. कॅसिनो सुरू व्हावेत, म्हणून या व्यवसासायशी संबंधित असलेल्या घटकांकडून राज्य सरकारकडे मागणी होत होती. त्याशिवाय सरकारातील काही मंत्री व आमदारही कॅसिनो सुरू करण्यासाठी आग्रही होते.
पर्यटन व्यवसायिकांचे प्रतिनिधित्व करणार्या टूर अॅण्ड ट्रॅव्हल असोसिएशन ऑफ गोवा या संघटनेने राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्याशिवाय या संघटनेने यापूर्वीच चार्टर विमानांना परवानगी द्यावी, अशी मागणही केली आहे.