congress crisis : काँग्रेस नावाची ‘पुरानी हवेली’! | पुढारी

congress crisis : काँग्रेस नावाची ‘पुरानी हवेली’!

दखलपात्र-विजय जाधव 

congress crisis : ‘रया गेलेल्या हवेलीत राहणार्‍या जमीनदारासारखी काँग्रेसची अवस्था झाली आहे, असे नामधारी जमीनदार उत्तर प्रदेशात आजही आढळतात’ …राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि एकेकाळचे काँग्रेसचे दिग्गज नेते शरद पवार काँग्रेसबद्दल अलीकडेच स्पष्टपणे बोलले.

त्यातून एका जुन्याच विषयावर चर्चेला तोंड फुटले. त्यांच्या या वक्‍तव्याचे सोयी-गैरसोयीचे अर्थ काढले जात असले, तरी त्यामागचे सत्य कसे नाकारणार? मुख्य प्रश्‍न आहे तो काँग्रेस नेतृत्वहीन झाली आहे काय? काँग्रेसच्या पाच दशकांच्या राजवटीतून निर्माण झालेली विकासाच्या प्रश्‍नांची कोंडी, सत्ताधार्‍यांबद्दलची नकारात्मकता आणि आघाडीच्या प्रयोगांतून विस्कळीत आणि दिशाहीन धोरणाचा प्रयोग
झाल्याने कंटाळलेल्या जनतेची नाडी ओळखून भारतीय जनता पक्षाने मोठ्या प्रयत्नपूर्वक सत्तेवर येण्याची तयारी केली. जनतेच्या मनातले विषय नेमके हेरले.

काँग्रेस नेतृत्वहीन झाली आहे काय? असा प्रश्‍न पडण्यासारखी पक्षाची आजची अवस्था देशाला आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना गोंधळात टाकणारी आहे. अनेक राज्यांत हा पक्ष लढण्याच्या स्थितीतही नाही. विरोधी पक्षाची भूमिकाही तो ठोसपणे बजावताना दिसत नाही. प्रबळ विरोधक नसणे हे लक्षण लोकशाहीत अनेक नवे प्रश्‍न निर्माण करणारे आहे. 135 वर्षांची परंपरा असलेल्या या पक्षाची अवस्था रया गेलेल्या हवेलीसारखी झाली आहे काय?

यातून बदलत गेलेल्या आणि केंद्रीय congress crisis सत्तेकडून विकासाचा आग्रह धरणार्‍या सामाजिक मानसिकतेचा खुबीने वापर करून घेतला. काँग्रेस पक्ष आणि त्यासोबत जाणार्‍या पक्षांच्या आघाड्या सत्तेसाठी कशा लायक नाहीत, याचा प्रचार-प्रसार करत अखेरीस स्वबळावर बहुमताने सत्ताही गाठली. हा राजकीय बदल स्वीकारण्याची काँग्रेसची आजही तयारी दिसत नाही. नवमतदार आणि पिढीच्या आशा-आकांक्षा न कळाल्याने भूमिकांचा गोंधळ आहे. धोरणाचाही दुष्काळ तयार झाला असून, त्यामुळेच विरोधी बाकावर प्रबळ विरोधक म्हणून बसण्याची पात्रता काँग्रेसने गमावली आहे.

congress crisis : काँगेस नेतृत्वहीन आणि दिशाहीन

ऐतिहासिक सत्तांतरानंतर भाजप आपला अजेंडा साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करीत असताना, काँगेस नेतृत्वहीन आणि दिशाहीन दिसते. भारतीय जनता पक्षाच्या सत्ताकाळातही न्याय न मिळाल्याने होरपळत असलेली जनता मोठ्या आशेने ही राजकीय पोकळी भरून निघण्याची प्रतीक्षा करते आहे. हा दबलेला आवाज बुलंद करण्याची जबाबदारी विरोधकांची असते. मात्र, ती पोकळी तशीच राहावी, राष्ट्रीय पातळीवर एकमेव पर्याय असणारी काँग्रेस अशीच विकलांग व्हावी आणि तिचे लवकरात लवकर विसर्जन व्हावे, ही भाजप नेत्यांची इच्छा आणि रणनीती आहे. त्याला त्याच ठोसपणे उत्तर देण्याची तयारी काँग्रेसकडे आजघडीला नाही.

काँग्रेस congress crisis संघटना आणि नेतृत्वाचा निर्नायकपणा येथेच दिसून येतो. भाजप सत्तेवर आल्यापासून गेल्या सात वर्षांत याचे समर्पक उत्तर हा पक्ष देऊ शकलेला नाही. काँग्रेसची वजाबाकी करून देशाचे राजकारण करता येत नाही, याची जाणीव असल्याने शरद पवार नेहमीच काँग्रेस नेतृत्वाला आव्हान देताना पक्षासमोरील वास्तवाची जाणीव करून देत असतात.

शरद पवार यांनीही बंडाचे निशाण फडकावले

सत्तेच्या जवळ राहण्याच्या मोहाने पक्षांतर्गत मतभेदांचे निमित्त साधून अनेक काँग्रेस नेते 2014 च्या आधी आणि नंतर भाजपवासी झाले. याची सुरुवात ममता बॅनर्जी यांच्या फुटीने (1998) झाली. पाठोपाठ शरद पवार यांनीही बंडाचे निशाण फडकावले. अशा अनेक दिग्गजांनी काँग्रेसला सोडून बंडखोरीचा मार्ग स्वीकारत काँग्रेस पोखरली.

काँग्रेसमध्ये असेपर्यंत घराणेशाहीचे राजकारण आपणास संधी देणार नाही, हे लक्षात आल्याने पवार यांनी विदेशीच्या मुद्द्यावर सवतासुभा मांडला खरा; पण तारिक अन्वर, पी. ए. संगमा, पटेल आदी नेत्यांना घेऊन राष्ट्रवादीला राष्ट्रीय करण्यात त्यांना अपयश आले. याच पवार
यांनी महाराष्ट्रात पक्ष वाढवला होता आणि मोठ्या संख्येने खासदार लोकसभेवर पाठवले होते.

congress crisis : काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या नेत्यांची भली मोठी यादी

संख्याबळाशिवाय सत्तेचा गड चढता येत नाही, याची पूर्ण जाणीव असल्याने पवार काँग्रेसला सोबत घेऊ इच्छितात. अलीकडेच मध्य प्रदेशातून दिग्विजय सिंह, कमलनाथ यांच्यासोबतच्या नेतृत्वाच्या वादातून बाहेर पडलेले ज्योतिरादित्य शिंदे, उत्तर प्रदेशातून जितीन प्रसाद, आसाममध्ये भाजपने मुख्यमंत्री केलेले हेमंत बिस्वा सर्मा, आंध्रचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी, अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडू, मनिपूरचे एन. वीरेन, तामिळनाडूतील ज्येष्ठ नेत्या जयंती नटराजन, पुद्दुचेरीचे एन. रंगास्वामी अशी काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या नेत्यांची भली मोठी यादी आहे. त्यांनी एकतर बंडखोरी करत स्वतंत्र पक्ष काढले, अनेकजण भाजपमध्ये जाऊन पावन झाले. मुख्यमंत्रीही बनले! राजस्थानात अशोक गेहलोत यांच्यासोबत दिलजमाई होत नसल्याने सचिन पायलट यांचाही एक पाय बाहेर आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील वाद विकोपाला गेला. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. गेल्यावर्षी काँग्रेसमधील नाराजांच्या 23 नेत्यांच्या गटाने पक्षाचे नेतृत्व, निवडणूक आणि कार्यपद्धतीवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्‍त केली होती. सोनिया गांधींना लेखी पत्र दिले होते, त्यावर आजअखेर कोणताच निर्णय झालेला नाही. काँग्रेस कार्यकारिणीच्या नियमित होणार्‍या बैठकाही आता इतिहासजमा झाल्या आहेत.

congress crisis : मूठभर पक्षनिष्ठांनी चालवलेल्या वादात पक्ष रसातळाला

सोनिया, राहुल की प्रियांका, या मूठभर पक्षनिष्ठांनी चालवलेल्या वादात पक्ष रसातळाला जातो आहे, याचे कोणालाच भान नाही. त्यासाठी पक्षाचे नेतृत्वही तितकेच दोषी आहे. हे वाद वेळीच मिटवले गेले नाहीत. महत्त्वाकांक्षी नेत्यांना पक्षबांधणी आणि वाढीचे कार्यक्रम दिले गेले नाहीत, जिथे सत्ता आहे त्या राज्यांत ही गटबाजी खदखदत राहील, याचीच दक्षता घेतली गेली.

भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. या पक्षाला तिसर्‍यांदा विजयाचा मार्ग मोकळा करून द्यायचा नाही, यासाठी विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न होताना दिसतात. शरद पवार त्याची चाचपणी करत आहेत. मात्र, पंतप्रधानपदाच्या मुद्द्यावर ही एकी फिसकटते.

काँग्रेसला राहुल गांधी यांना पंतप्रधान करायचे आहे. विरोधकांतली ही दुफळी भाजपने हेरली आहे. जे काही पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे त्यांना क्षीण करण्याचे प्रयत्न सर्वप्रकारे सुरू झाले आहेत. या स्थितीत भाजपसारख्या आक्रमक पक्षासोबत दोन हात करण्यासाठी काँग्रेसकडे पर्याय म्हणून पाहिले जात नाही, हे वास्तव आहे.

जो पक्ष आपला पूर्णवेळ अध्यक्ष निवडू शकत नाही, देशासमोरील आणि देशातील प्रश्‍नांवर ज्या पक्षाचे स्पष्ट धोरण आणि सत्ताधार्‍यांशी दोन हात करण्याची, चुकीच्या आर्थिक धोरणास ठोस उत्तर देण्याची रणनीती नाही, देशातील मोठ्या सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील
कंपन्या, दूरसंचार क्षेत्राच्या खासगीकरणाचा सेल लावला असताना त्यावर बोलण्याची कोणाची तयारी नाही.

संसदेच्या आखाड्यात तशी लक्षवेधी कामगिरी नाही, सामान्य जनतेचा आवाज बनण्याची ताकद हा पक्ष हरवत चालला आहे. प्रबळ विरोधक नसणे, जे काही आहेत, त्यांचा आवाज लोकांपर्यंत न पोहोचणे, पोहोचवला जाणार नाही याची खबरदारी घेणे, शेतकरी, मजूर, कामगार, सर्वच क्षेत्रांतील सामान्य घटकांकडे, त्यांच्या प्रश्‍न आणि लढ्यांकडे दुर्लक्ष करणे, हे सशक्‍त लोकशाहीचे लक्षण निश्‍चितच नव्हे.

काँग्रेस ही चळवळ आहे, याचे नेतृत्वाचे भान सुटल्याने या 135 वर्षे जुन्याजाणत्या पक्षाची अवस्था पडक्या हवेलीसारखी झाली आहे!

हे ही वाचलं का?

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress

Back to top button