चौकशीच्या नावावर युवकांची धरपकड; कुडचडेत दहशतीचे वातावरण | पुढारी

चौकशीच्या नावावर युवकांची धरपकड; कुडचडेत दहशतीचे वातावरण

मडगाव : पुढारी वृत्तसेवा कुडचडे येथील रेती व्यवसायातून झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास करणारे एक ज्येष्ठ पोलिस अधिकारी 31 सप्टेंबर रोजी सेवेतून निवृत्त होणार आहेत. त्यामुळे हे प्रकरण लवकरच सोडवण्यासाठी पोलिसांनी साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर करण्यात सुरू केला आहे.

संशयित म्हणून अटक न करता गेल्या सहा दिवसांपूर्वी चौकशीच्या नावावर ताब्यात घेण्यात आलेल्या कुडचडेतील बेकायदेशीर रेती व्यवसायात सक्रिय असलेल्यांना युवकांना अद्याप सोडण्यात आलेले नाही. चौकशीच्या नावावर युवकांची धरपकड केली जात आहे. पोलिसांच्या एकंदर काम करण्याच्या पद्धतीमुळे कुडचडेत दहशतीचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे.

बाणसाय येथील नदीत 1 सप्टेंबर रोजी हा गोळीबार झाला होता. अंधाराचा फायदा घेत अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून युसूफ आलम या झारखंड येथील कामगाराचा खून केला होता. तर मोहम्मद साहू हा कामगार गंभीररीत्या जखमी झाला होता. या घटनेला आता सात दिवस उलटून गेले आहेत. पण पोलिसांच्या हाती कोणतेही पुरावे आलेले नाहीत. गोळी झाडण्यासाठी वापरण्यात आलेली ती बंदूक अजून पोलिसांना सापडलेली नाही. पोलिसांनी शंभरपेक्षा जास्त तरुणांना आतापर्यंत चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

हा तपास गुप्त पद्धतीने करण्यासाठी खास सांगे येथील आयआरबी पोलिसांसाठी स्थापन करण्यात आलेल्या कॅम्पची निवड करण्यात आलेली आहे. तपासासाठी सांगे, केपे, कुडचडे, काणकोण आणि कुंकळ्ळी पोलिस स्थानकातील पोलिसांना नेमण्यात आले असून क्राईम ब्रँचचे अधिकारी सुद्धा या पोलिस तपासात सहभागी झाले आहेत. गेले सात दिवस विविध दृष्टिकोनातून तपास लावण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत. हा गोळीबार रेती व्यवसायातील वादातून झाल्याचा अंदाज पोलिस व्यक्त करत आहेत आणि त्यासाठी रेतीच्या होड्या असलेल्या युवकांना तसेच रेतीचे ट्रक चालवणार्‍या लोकांना ताब्यात घेऊन चौकशी करण्याचा सपाटा पोलिसांनी लावला आहे.

बाणसाय येथिल पाच जणांना बेकायदेशीरपणे रेतीचे उत्खनन केल्याप्रकरणी सुरुवातीलाच पोलिसांनी अटक केली होती. त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केलेला आहे. त्यानंतर खून प्रकरणार एकही अटक अद्याप झालेली नाही. शेल्डे येथील एका रेती व्यावसायिकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते.त्याला अजून सोडण्यात आलेले नाही. त्या व्यतिरिक्त अन्य काही रेती व्यावसायिकांना चौकशीसाठी म्हणून ताब्यात घेण्यात आले होते. घरात गणपती असताना कित्येक युवकांना पोलिसांनी उचलून आयआरबी कॅम्प मध्ये नेले होते. त्यांना दोन तीन दिवसांनंतर सोडण्यात आले. या प्रकरणाशी कोणताही संबंध नसलेल्यांनाही उचलून नेले जात असल्याने कुडचडेत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रेती व्यवसायात मजूर म्हणून काम करणारे काही कामगार अजून पोलिसांच्या ताब्यात आहेत असे कळते. कोणालाही उचला पण आरोपीला शोधून काढा, असा आदेश पोलिस महासंचालकांनी दिला आहे. म्हणून पोलिसांनी संशयाचा आधार घेऊन धरपकड मोहिमेला सुरुवात केली आहे.

अनेक प्रश्न अनुत्तरित

या प्रकरणाची संपूर्ण पार्श्वभूमी संशयास्पद आहे. ज्या दिवशी गोळीबार झाला. त्यादिवशी हे कामगार रेती भरलेली बोट घेऊन काठावर येत होते.गोळीबारात एक जण दगावला आणि दुसरा गंभीररीत्या जखमी झाला होता.अशा स्थितीत तब्बल चोवीस क्यूबिक मीटर रेती भरलेली बोट घेऊन एकमेव कामगार काठावर पोचलाच कसा. कोणाच्या सांगण्यावरुन त्या होडीतील रेती नदीत टाकण्यात आली. होडीतील रेती नदीत टाकायला किमान तीन तास लागले असतील. या अवधीत पोलिसांना त्या प्रकरणाची माहिती का देण्यात आली नाही. रेती साठवण्यासाठी काठावर तयार करण्यात आलेल्या परायेवरून रेती कशी गायब झाली. शिवाय गोळीबाराची माहिती पोलिसांना देण्यापूर्वी मयत आणि जखमी कामगारांना इस्पितळात कसे नेण्यात आले असे अनेक प्रश्न अजून अनुत्तरित आहेत. पोलिसांना काहीच पुरावे गोळा करता आलेले नाहीत.

त्यामुळे त्यांनी आपला मोर्चा आता मडगाव शहराकडे वळवला आहे. मडगाव भागात काही शार्पशूटर आहेत. त्यांच्या करवी हा गोळीबार झाला नाही ना या अनुषंगाने तपास सुरू करण्यात आल्याचे पोलिस अधिकार्‍याने आपले नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले. पोलिस उचलून नेतील या भीतीपोटी लोक माहिती देण्यासाठी समोर येत नाहीत.

घटनेची सखोल चौकशी व्हावी : होडरकर

बाणसाय येथे झालेल्या गोळीबार प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी कुडचडे काकोडा नगरपालिकेचे नगरसेवक बाळकृष्ण होडरकर यांनी केली आहे. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाल्यास त्या कामगाराला न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा होडरकर यांनी दिला आहे. कुडचडेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत होडरकर बोलत होते. कुडचडेत घडलेले हे प्रकरण गंभीर आहे. स्वत: कायदामंत्री असलेल्या नीलेश काब्राल यांनी अजून त्यावर भाष्य केलेले नाही. त्यांना हे खाते सांभाळता येत नसेल तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांच्याकडून हे खाते काढून घ्यावे. रेती व्यवसायावर अनेक कुटुंबे अवलंबून आहेत. त्यामुळे सरकारने हा व्यवसाय कायदेशीर करावा, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

Back to top button