गोवा : दूधसागर डोहात बुडालेला तरुण बेपत्ताच; शोध मोहीम सुरूच | पुढारी

गोवा : दूधसागर डोहात बुडालेला तरुण बेपत्ताच; शोध मोहीम सुरूच

धारबांदोडा : पुढारी वृत्तसेवा कुळे येथील दूधसागर धबधब्याच्या डोहात बुडालेल्या भोपाळ येथील अर्पित शुक्ला (31) या युवकाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. सोमवारी अर्पित शुक्ला, त्यांची पत्नी व दीड वर्षाची मुलगी तसेच त्यांचे मित्र दूधसागर धबधब्यावर पर्यटनासाठी आले असता संध्याकाळी अंदाजे 6 वाजण्याच्या सुमारास तो नदीत बुडाला होता.

घटना घडलेले ठिकाण हे कुळेहून सुमारे 14 किलोमीटर अंतरावर असल्याने सोमवारी शोध मोहीम करणे शक्य झाले नाही. त्यामुळे मंगळवारी या युवकाचा शोध घेण्याचे काम हातात घेण्यात आले आहे. शोध मोहिमेसाठी अग्निशमन दल, कुळे पोलिस व नौदलाचे पथक
घटनास्थळी दाखल झाले आहे. आमदार गणेश गावकर यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

कुळे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पाचजणांचा ग्रुप पर्यटनासाठी कुळेत दाखल झाला होता. संध्या. 4:30 वाजता गोवा एक्सप्रेस ट्रेनमधून कुळेहून दूधसागर धब्यावर पर्यटनासाठी हा ग्रुप गेला होता. खास

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ओरिसा नामक युवकाने त्यांना पर्यटनासाठी दूधसागर धबधब्यावर नेले होते. कुळे पोलिसांच्या मते बुडालेला युवक हा धबधब्याच्या मुख्य डोहाकडे गेला असता तो पाय घसरून नदीत गेला. मात्र काही सूत्रांच्या मते अर्पित हा दूधसागर रेल्वे पुलावरच्या कठड्यावर बसला होता, त्यावेळी तो घसरून खाली कोसळल्याचे सांगितले जात आहे.

पावसाळ्यात धबधब्याजवळ धोकादायक परिस्थिती निर्माण होत असते शिवाय पर्यटकांना घेऊन जाणार्‍या गाईडने याबद्दल धोक्याची सूचना पर्यटना देण्याचे आवश्यकता असते. मात्र, बुडालेला युवक पुलाच्या कठड्यावर बसण्यास जात असताना त्याला धोक्याची सूचना का दिली गेली नाही, असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे.

ओरिसामुळे कुळेची बदनामी

गेल्या अनेक वर्षांपासून ओरिसा नामक युवक कुवेत वावरात असून बेकायदेशीरपणे पर्यटकांना धबधब्यावर घेऊन जात आहे. पोलिस, रेल्वे पोलिस व रेल्वे अधिकार्‍यांबरोबर संगनमत करून तो हा बेकायदेशीरपणे धंदा करीत आहे असा आरोप होत असून, यामुळे तो फार शेफारला असल्याचे बोलले जात आहे.

महत्त्वाचे म्हणजे दूधसागर पर्यटनाच्या हंगामात जीप गाड्या मिळत नाही म्हणून जे पर्यटक माघारी फिरण्याच्या तयारीत असतात त्यांना ओरिसा हा युवक रेल्वेने धबधब्यावर घेऊन जात असतो, मात्र त्याच्यावर कोणतीच कारवाई होत नसल्याने स्थानिकामध्ये नाराजी आहे. या ओरिसा नामक युवकावर कडक कारवाई करावी, अशी मागणी सध्या होत आहे.

Back to top button