धक्कादायक! उत्तर गोव्यातील बीचवर ब्रिटीश महिलेवर तिच्या पार्टनरसमोरच बलात्कार | पुढारी

धक्कादायक! उत्तर गोव्यातील बीचवर ब्रिटीश महिलेवर तिच्या पार्टनरसमोरच बलात्कार

पणजी; पुढारी ऑनलाईन

उत्तर गोव्यातील (Goa) हरमल समुद्रकिनाऱ्यावर (Arambol beach) एका ब्रिटीश महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे पीडित महिलेच्या पुरुष पार्टनरमोरच (male partner) एका स्थानिक व्यक्तीने मसाज करण्याच्या बहाण्याने बलात्कार केला असल्याची माहिती मंगळवारी पोलिसांनी दिली.

या घटनेतील स्थानिक रहिवासी असलेला संशयित विन्सेंट डिसोझा (३२) हा अशा एका गटातील आहे जो उत्तर गोव्यातील हरमल समुद्रकिनाऱ्याजवळ बेकायदेशीरपणे मसाज करण्याचे काम करतो. त्याचा या समुद्रकिनाऱ्यावर विदेशी पर्यटकांमध्ये खूप दबदबा आहे. त्याने याआधी एका शाळेत ग्रंथपाल म्हणूनही काम केले होते, असे पोलिसांनी सांगितले. पेडणे पोलिसांनी सोमवारी त्याला अटक केली आहे.

गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या एका मध्यमवयीन महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, पीडित महिला समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या पाण्याजवळ विश्रांती घेत होती. त्याचवेळी मसाज करण्याच्या बहाण्याने संशयिताने तिच्यावर बलात्कार केला. ही घटना पीडीत महिलेच्या पार्टनरसमोरच घडली.

ही घटना २ जून रोजी घडली होती. पण महिलेने ब्रिटनमधील तिच्या कुटुंबीयांशी सल्लामसलत केल्यानंतर आणि भारतातील ब्रिटीश दूतावासाकडून मदत मागितल्यानंतर सोमवारी पेडणे पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली. या प्रकरणी तक्रार मिळाल्यानंतर एका तासाच्या आत निरीक्षक विक्रम नाईक यांच्या नेतृत्वाखाली पेडणे पोलिसांनी कारवाई केली आणि आरोपीला अटक केली, असे पोलिस अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले आहे.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, संशयिताने याआधी एका शाळेत ग्रंथपाल म्हणूनही काम केले होते. “आम्ही त्याचे मागील गुन्हेगारी रेकॉर्ड्स मिळविण्यासाठी संबंधित पोलिस ठाण्यात संपर्क साधला आहे. सध्या तो ग्रंथपाल म्हणून काम करत नाही,” असे अधिकाऱ्याने सांगितले.

सोमवारी रात्री संशयिताला म्हापसा (Mapusa) येथील जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. संशयिताविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३७६ (बलात्कार) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर करत आहेत.

 हे ही वाचा :

Back to top button