गोवा : गप्प रहा, अन्यथा परीक्षेत पाहून घेऊ; प्राध्यापकांची विद्यार्थ्यांना धमकी | पुढारी

गोवा : गप्प रहा, अन्यथा परीक्षेत पाहून घेऊ; प्राध्यापकांची विद्यार्थ्यांना धमकी

मडगाव; पुढारी वृत्तसेवा : दक्षिण गोव्यातील वादात सापडलेल्या महाविद्यालयातील ड्रग्सच्या आहारी गेलेल्या प्राध्यापकांमुळे विद्यार्थ्यांमध्ये तणावाची स्थिती कायम आहे. तीन मुलांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतरही विद्यार्थ्यांवर दबाव आणण्याचे प्रकार सुरूच आहेत. आपले नाव उघड होऊ नये, यासाठी मुलांना गप्प रहा अन्यथा परीक्षेत पाहून घेऊ, अशा धमक्या दिल्या जात असल्याचे उघड झाले आहे.

पालकांवरही दबाव टाकण्यात आल्याचा प्रकार आता समोर आला असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणी लक्ष घालावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या प्रकरणी ‘पुढारी’ने सातत्याने आवाज उठविण्याचे काम केले आहे. त्यामुळे ड्रग्सच्या व्यवसायात अडकलेल्या ‘त्या’ प्राध्यापकांची बोबडीच वळली आहे. प्राध्यापकांच्या ड्रग्स व्यवसायाचे बिंग फुटल्याने त्यांनी विद्यार्थ्यांनाच धारेवर धरण्याचे प्रकार सुरू केले आहेत. प्राध्यापकांकडून येणार्‍या धमक्यांमुळे विद्यार्थ्यांवर विपरित परिणाम होण्याची भीती पालकांमध्ये निर्माण झाली आहे.

दक्षिण गोव्यातील ‘त्या’ महाविद्यालयात शिकणार्‍या एका विद्यार्थिनीने आपल्या निवासस्थानी आत्महत्या केल्यानंतर दोन महिन्यांच्या आत अजून तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेले विद्यार्थी वर्गात कधी हजरच असत नाही, असे सांगून महाविद्यालयाने हात झटकले होते. त्यानंतर आत्महत्या केलेली ती विद्यार्थिनी व त्यानंतर अन्य आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेले विद्यार्थी प्रेमसंबंधात अडकून टोकाची भूमिका घेत असल्याचे सांगून पालकांचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न महाविद्यालयाने केला होता. मात्र, आपली बाजू मांडून विद्यार्थ्यांना दोषी ठरवणार्‍या त्या प्राध्यापकांचे हात अमली पदार्थांच्या व्यवसायात असल्याचे उघड झाल्याने संबंधित प्राध्यापक हे प्रकरण दडपण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत. सदरचे प्राध्यापक सध्या पालक व काही विद्यार्थ्यांशी संपर्क साधत असल्याचे वृत्त आहे.

प्राध्यापकच करताहेत ड्रग्ज सेवनासाठी प्रवृत्त

काही विद्यर्थ्यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले की, आपल्या संपर्कात आलेले ते प्राध्यापक कायमस्वरूपी नोकरीला नाहीत. त्यांना वेळीच पगारही मिळत नाही. नोकरी कायम होण्यासाठी हे शिक्षक पीएचडीचे शिक्षण घेत आहेत. मात्र, हातात पुरेसा पैसा नसल्याने त्यांची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. यासाठी शिक्षक अमली पदार्थांच्या व्यवहारात गुंतल्याचे समोर आले आहे. अनेक वेळा या प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे सेवन करण्यास ही प्रवृत्त केल्याचे त्या विद्यार्थ्यांनी सांगितले आहे.

प्राध्यापकांची धक्कादायक कृती

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांची प्रकरणे व प्राध्यापकांचे अमली पदार्थांच्या विळख्यात अडकणे ही धक्कादायक आहे. पालकांनी आपल्या मुलांना प्रत्येक सुख सुविधा देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे हे विद्यार्थी लगेच क्षणिक सुखाकडे आकर्षित होतात. हे क्षणिक सुख अनेकांना चुकीच्या मार्गावर खेचते. पूर्वीच्या काळी शिक्षक व विद्यार्थ्यांचे नाते एक आदरयुक्त भीतीचे होते. शांती देसाई व सदानंद देसाई हे दोन शिक्षक माझे गुरू आहेत. या शिक्षकांनी मला घडविले याचा मला आजही अभिमान आहे, असे शिक्षक आताच्या पिढीत तयार होणे कठीणच, अशी खंत ज्येष्ठ समाजसेवक नीलेश प्रभू यांनी सांगितले.

व्यवस्थापनाने कारवाई करावी

प्राध्यापक जर अमली पदार्थांच्या आहारी गेलेले असतील, तर ती खरोखरच गंभीर बाब आहे. सर्वात आधी या प्राध्यापकांनी मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार करून घेतले पाहिजेत. शिक्षकी पेशा हा इतर पेशापेक्षा वेगळा आणि पवित्र पेशा आहे. त्यासाठी शिक्षकांनी किंवा प्राध्यापकांनी शिक्षकी पेशाचे भान ठेवून वागले पाहिजे. तरीही शिक्षक जबाबदारीने वागत नसल्यास व्यवस्थापनाने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. अमली पदार्थ विक्री करणार्‍यांवर कडक कारवाई झालीच पाहिजे, असे मत साहित्यिका पूर्णिमा देसाई यांनी व्यक्त केली.

त्या प्राध्यापकांना शिक्षण क्षेत्रात स्थान नको

अमली पदार्थांच्या आहारी जाणार्‍या प्राध्यापकांना शिक्षण क्षेत्रात मुळीच स्थान नाही. शिक्षक हा युवा पिढीला घडवणारा त्याला प्रगतीपथावर घेऊन जाणारा असला पाहिजे. खरे तर शिक्षक हा युवा पिढीचे प्रेरणास्थान असला पाहिजे. अंमली पदार्थांच्या आहारी जाणारा प्राध्यापक युवकांना कसे घडविणार? या प्राध्यापकांवर वेळीच कारवाई होण्याची गरज असल्याचे प्रा. नवसो परब यांनी सांगितले.

Back to top button