वास्कोतील अपहृत मुलीची सुटका | पुढारी

वास्कोतील अपहृत मुलीची सुटका

वास्को ; पुढारी वृत्तसेवा : आल्त दाबोळी येथील चौदा वर्षीय मुलीचे अपहरण करणार्‍या महम्मद जाफर कादरी (23) याला वास्को पोलिस पथकाने नवी मुंबई येथे ताब्यात घेऊन मुलीची सुटका केली. कादरी याच्या विरोधात भादंविसं कलम 363 तसेच गोवा बाल कायदाच्या आठ कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्या मुलीची वैद्यकीय तपासणी अहवालानंतर कादरीविरोधात आणखी गुन्हे नोंद होण्याची शक्यता आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी 30 मे रोजी केली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपासाला आरंभ केल्यावर एका युवकाचे नाव समोर आले. मूळचा उत्तरप्रदेश परंतु सध्या कामानिमित्त आल्त दाबोळी येथे तो युवक राहत होता. त्याचा शोध घेण्यासाठी तंत्रज्ञान सहकार्य तसेच पोलिसांच्या विविध सूत्रांचे सहकार्य घेण्यात आले.

तो युवक कोपरखैरणे नवी मुंबई येथे असल्याचे उघडकीस आले. यासंबंधी तेथील पोलिसांना माहिती देण्यात आली. यादरम्यान वास्को पोलिस स्थानकाचे निरीक्षक कपिल नायक यांनी उपनिरीक्षक रोहन नागेश, हवालदार संतोष भाटकर, महिला विश्रांती गावकर यांचा समावेश असलेल्या पथकाला नवी मुंबई येथे पाठविले.

या पथकाने कोपरखैरणे पोलिसांच्या सहकार्याने महम्मद जाफर कादरी याचा शोध घेण्यास आरंभ केला. त्याचा शोध लागल्यावर त्याच्यासमावेत असलेल्या त्या अपहृत मुलीला ताब्यात घेण्यात आले. त्यांना वास्कोत आणल्यावर पोलिसांनी कादरी याच्याविरोधात गुन्हा नोंद करून त्याला रीतसर अटक केली.

Back to top button